महाड | विधान परिषदेचे विरोधी अंबादास दानवे यांनी सोमवारी (१३ जानेवारी) महाड तालुक्यातील तळीये दरडग्रस्त गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी तळीये दुर्घटनास्थळालादेखील भेट दिली. रखडलेल्या घरांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या.
या भेटीत त्यांनी म्हाडा अंतर्गत सुरु असलेल्या घरांची पाहणी केली आणि रखडलेल्या घरांच्या अपूर्णावस्थेबाबत संबंधित अधिकार्यांना धारेवर धरले. लवकर उर्वरित घरांची कामे पूर्ण करण्याच्या सूचनादेखील दानवे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी सरकारला जाब विचारत सरकार तळीयेच्या पुनर्दुर्घटनेची वाट बघत आहे का ? असा सवाल उपस्थित केला.
घरांपासून वंचित असलेल्या नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधत दानवे यांनी नागरिकांना दिलासादेखील दिला. यावेळी त्यांच्यासोबत महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, ठाकरे शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.