पनवेल | ठाणे वन विभागाचे कर्मचारी, वन्यजीव वॉर्डन आणि स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या १५ सदस्यांच्या गटाने केलेल्या सर्वेक्षणात खारघर टेकडीवरील मोकळ्या भूखंडावर बिबट्याच्या हलया पायाच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे, खारघर टेकडीवर दोन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असल्याची वन विभागाकडून देण्यात आली आहे.
खारघर टेकडीवर ५ जानेवारीला मध्यरात्री फणसवाडीकडे जाणार्या रस्त्यावर सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. तीन दिवसांच्या मोहिमेनंतर फणसवाडी आणि ओवे गावादरम्यानच्या टेकडीवर असलेल्या मोकळ्या भूखंडावर हलया पाऊलखुणा दिसल्या आहेत.
टेकडीच्या भागात वेगवेगळ्या घनतेच्या कोरड्या गवतांसह तीन मोठे मोकळे भूखंड आहेत. दरम्यान, भागात बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते, त्या भागापासून १० किलोमीटर अंतरावर बिबट्याच्या पाऊल खुणा आढळून आल्या आहेत. वन विभागाचे कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा गट पायाच्या खुणा आणि बिबट्याचा मागोवा घेत आहेत. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास गटाला मदत करण्यासाठी एक रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली होती.
हलया पाऊलखुणा आढळून आतापर्यंत दोन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच, टीम तर्फे सर्वेक्षण देखील सुरूच ठेवण्यात आले आहेत. -गजानन पांढरपट्टे, परिक्षेत्र वनाधिकारी, पनवेल