उतेखोल/माणगांव | माणगांवची जीवनदायिनी असलेल्या काळ नदीचे पात्र कचर्यामुळे दूषित होत चालले आहे. पात्राला कचर्याचा विळखा पडत चालला असून, सर्वत्र पसरलेल्या कचर्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे नगरपंचायतीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
काळच्या निर्मळ पाण्यामुळेच या नदीकिनारी वसलेल्या माणगांवच्या विकासास चालना मिळाली. बघता बघता अनेक लोकवसाहती, मोठाले कॉम्प्लेस, हॉटेल, चहा टपर्या, छोटे उद्योग व्यवसाय, मॉल, शॉपिंग सेंटर, अनेक शालेय संस्था, शासकिय कार्यालये आणि विशेष म्हणजे तहसिलदार प्रांताधिकारी यांची भव्यदिव्य निवासस्थाने व कार्यालये या सर्वांनाच वापर व पिण्यासाठी इतर सर्वसाधारण कामांसाठी तसेच येथील महत्वाची शेती, भाजीचे मळे मासेमारी करुन उदरनिर्वाह करणारे तसेच खवय्यांसाठीही मिळणारे विविध मासे आपल्या पोटातच जोपासणारी काळ नदी आणि जलस्रोत सर्वांना आरोग्यदायी जीवन बहाल करत आहे.
काळ नदीला म्हणूनच तर माणगांवची जीवनदायिनी संबोधले जाते. मात्र सद्यस्थितीत या नदीचे आता गटार करण्याचा घाट घातला जात आहे. काळनदीतच सांडपाणी सोडले गेले आहे. कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना सुरु आहेत, परंतु मुळातच ज्या जलस्रोतावर त्या राबविण्यात येत आहेत तेथील नवीन जॅकवेलमधून प्रदूषित पाणी करुन लोकांना देणार काय, हे स्रोत प्रदूषणमुक्त कधी आणि कोण करणार? हा सवाल ऐरणीवर आला आहे.
नगरपंचायत प्रशासन कचर्याचे होत असलेले अतिक्रमण कधी हटविणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तालुयातील शेतीला पूरक असा बहुउद्देशीय कालव्याचे गटार झाले आहे. कालव्याची अवस्था भयंकर घाणेरडी झाली, कालवा सफाई करताना कालव्यातील घाणच काळ नदीत टाकली गेल्याचे चित्र सध्या काळनदीवर दिसून येत आहे. नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाची जॅकवेलदेखील या जलस्रोतातूनच पाणी उपसा करुन थेट शुध्दीकरण केंद्रात नेऊन माणगावकरांची तहान भागवत आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी त्या ठिकाणी निषिद्ध क्षेत्र घोषित करुन येथे झालेले कचर्याचे अतिक्रमण प्राथमिकतेने हटविण्यास नगरपंचायत प्रशासनासह सर्वच प्रशासकीय अधिकार्यांनी तातडीने लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे. अन्यथा लवकरच सार्वजनिक आरोग्य धोयात तर येईल तसेच पाण्यावर अवलंबीत जल-जीवसृष्टी देखील नजिकच्या काळात नामशेष झाल्यास आश्चर्य वाटायला नको.