मुलाने पैशांसाठी केली मित्राची हत्या ! १४ वर्षीय बालकाच्या हत्येचा उलगडा

दारुच्या आहारी गेलेल्या....

By Raigad Times    14-Jan-2025
Total Views |
pen
 
पेण | पेणमध्ये १४ वर्षीय बालकाची हत्या करुन, त्याचा मृतदेह कासार तलावाजवळील झुडपात फेकून देण्यात आला होता. ही हत्या त्याच्या मित्रानेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दारुच्या आहारी गेलेल्या या १५ वर्षीय मुलाने पैशांच्या किरकोळ मित्राच्या डोक्यात लाकडी राफ्टरने वार करत, त्याची निर्घृण केली.
 
पेण पोलिसांना १० जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास एक १४ वर्षीय बालक रक्ताच्या थारोळ्यात कासार तलाव साई मंदीर शेजारील झाडाझुडपात मृतावस्थेत पडून असल्याची माहिती डायल ११२ वरुन मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून प्राथमिक तपास करत, मृत मुलाच्या वर्णनावरुन त्याच्या पालकांचा घेतला. त्यावरुन मृत मुलाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
 
सदर मृतदेह पेण फणसडोंगरी येथे राहणार्‍या गणेश बाळू चुणारे या चौदा वर्षीय मुलाचा असल्याचे निष्पन्न झाले. आठवीमध्ये शिकत असलेला गणेश ९ जानेवारी रोजी दुपारपासून घरी आला नव्हता. तो दुसर्‍या दिवशी मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी त्याचे वडील बाळू सिताराम चुणारे यांच्या पेण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत, तपास सुरु करण्यात आला. पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी घटनास्थळी पोहोचून, तपास यंत्रण सज्ज केली.
 
फॉरेन्सिक हॅन व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे, गणेशच्या सोबत असणार्‍या मित्रांचा शोध घेण्यात आला. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी टोंम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करत, तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. संपूर्ण पेण शहरात नाकेबंदी करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आणि अवघ्या ४ तासांत खुनीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
 
गणेशची हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, त्याचा पेण शहरातील खरोशी कोयना मित्रच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तो देखील अल्पवयीन असून, १५ वर्षांचा आहे. बॉड (सोल्यूशन), दारुच्या आहारी गेलेल्या या मुलाचा पैशांच्या किरकोळ कारणावरुन गणेशसोबत वाद झाला आणि या वादातून त्याने गणेशच्या डोक्यावर लाकडी राफ्टरने वार करत त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
 
या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे तसेच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागूल करीत आहेत. दरम्यान, हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कार्यान्वित केलेल्या विशेष पथकामध्ये शहरातील कॅमेरे फुटेज संकलन, फुटेज चेक, नाकेबंदी, खुनीचा शोध, पंचनामा व पुरावे हस्तगत करण्यात सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड व त्यांचे पथक, पोलीस उपनिरीक्षक समद बेग, प्रतीक पोकळे, विक्रम नवरखेडे, सहायक फौजदार भाग्यवान कांबळे, राजेश पाटील, पोलीस हवालदार प्रकाश कोकरे, राजेंद्र भोनकर, सतोष जाधव, सांगर खांडसकर, अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हस्कोटी, सुशांत भोईर, पोलीस नाईक म्हात्रे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद तलवारे, संदीप शिंगाडे, अशांत सांगविकर यांनी मोलाची कामगिरी बजावली.