स्वतःच्या बंदुकीची गोळी लागून तरुणाचा मृत्यू

14 Jan 2025 16:30:19
 mangoan
 
माणगाव | शिकारीसाठी गेलेला मधुकर वाघमारे या तरुणाचा झाडावरून खाली उतरत असताना हातातून बंदूक खाली पडून त्यातून सुटलेल्या गोळीने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. माणगाव तालुक्यातील पाणोसे आदिवासीवाडी जवळ ही घडली आहे. बेकायदेशीर ठासणीची बंदूक बाळगून शिकारीसाठी गेलेल्या तरुणाला बंदूकीची गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना माणगावमध्ये घडली आहे.
 
माणगाव तालुक्यातील कवळीचा माळ येथील जंगल भागात शनिवारी, ११ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. याप्रकरणी मृत तरुणावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून माणगावात अवैद्य ठासणीच्या आणखी किती बंदूका आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
 
माणगाव तालुक्यातील पाणोसे आदिवासीवाडी जवळील कवळीचा माळ येथील जंगल भागात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मधुकर सखाराम वाघमारे (वय ३२) हा त्याची बेकायदेशीर ठासणीची बंदूक घेऊन शिकारीसाठी झाडावर बसला तो झाडावरुन खाली उतरत असताना, त्याच्या हातातील बंदूक, निष्काळजीपणे त्याच्या हातून खाली जमिनीवर पडली.
 
ती बंदूक जमिनीवर पडताच बंदुकीतून गोळी सुटली. बंदुकीतून सुटलेली गोळी थेट मधुकर वाघमारे याच्या उजव्या मांडीत घुसली. त्यात तो गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले अधिक तपास करत आहेत
 
 
Powered By Sangraha 9.0