धावत्या एसटीचा ब्रेक फेल... ४० प्रवाशांचा जीव टांगणीला

चालकाचे प्रसंगावधान आणि टायरसमोर दगडी टाकून प्रवाशांनी थांबवली गाडी...

By Raigad Times    15-Jan-2025
Total Views |
poladpur
 
पोलादपूर | ओंबळी-पोलादपूर एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे बसमधील ४० प्रवाशांवर बाका प्रसंग ओढवला होता. चालक आणि काही प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर प्रवाशांनी संताप व्यक्त करत केला आहे. नादुरुस्त गाड्या पाठवून महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप केला आहे.
 
मंगळवारी (१४ जानेवारी) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ओंबळीहून पोलादपूरकडे एसटी निघाली होती. पैठण जवळील एका तीव्र उतारावर या एसटीचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला घसरली. बसचालकाने प्रसंगावधान राखत ब्रेकवर अक्षरशः उभे राहून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून टायरसमोर मोठमोठ्या दगडी टाकल्यामुळे बस थांबली.
 
poladpur
 
यावेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. यामध्ये वयोवृद्ध, विद्यार्थी व महिलांची मोठी संख्या होती. सुदैवाने अनर्थ टळला. यानंतर मात्र प्रवाशांनी संताप व्यक्त केला. एसटी मंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी केली. दरम्यान, शिवसेना पोलादपूर तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार, नितीन भोसले, माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते रामदास कळंबे यांनी एसटीच्या अधिकार्‍यांना फैलावर घेतले. यावेळी लवकरच एक बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले.