अलिबाग | इस्रायलचे भारतातील महावाणिज्यदूत कोब्बी शोशान्नी यांनी मंगळवारी (१४ जानेवारी) अलिबागला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी इस्त्रायली धार्मिक स्थळांसह ज्यु समाज स्मशानभूमीची पाहणी केली. जिल्ह्यातील ज्यू समुदायाच्या मालमत्तांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्वपूर्ण होता.
शोशान्नी यांनी रेवदंडा बिथएई सिनेगॉगला (ज्यू समाजाचे प्रार्थनास्थळ) व ज्यु समाज स्मशानभूमी चौल येथे भेट दिली. त्यानंतर अलिबाग सिनेगॉग, नवगाव येथील ज्यू समाजाच्या स्मशानभूमीची पाहणी करुन ते मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत रायगड ज्यूईस असोसिएशनचे अध्यक्ष हेर्जल भोनकर, सचिव बेंजामिन वासकर, खजिनदार अब्राहम आवास्कर यांच्यासह दहा ते पंधरा ज्यू समाजाचे नागरिक, तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हजर होते. कोब्बी शोशान्नी हे सध्या मुंबईत इस्रायलचे कौन्सुल जनरल म्हणून काम पाहत आहेत.
ते महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा येथे इस्रायल राज्याचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. इस्त्रायली समुदायाच्या मालमत्तांचे संरक्षण रायगड जिल्ह्यात ज्यू समूदाय फार पूर्वीपासून मोठ्या संख्येने रहात होता. त्यांची व्यक्तिगत आणि समाजाची मालमत्ता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. यातील अनेक ठिकाणी अतिक्रमण होत आहे. याबाबत शोशान्नी यांनी इथल्या समाजाच्या प्रमुखांशी चर्चा केली. राज्य सरकारशी चर्चा करून अतिक्रमण थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील, असे रायगड जिल्हा ज्युईस असोसिएशनचे अध्यक्ष हेर्जल भोनकर यांनी सांगितले.