पनवेल | बँक ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याचे भासवून सायबर टोळीने खारघर येथील बँकेच्या सेवानिवृत्त अधिकार्याच्या पत्नीला गंडा घातला. बँकेत ठेवलेल्या ५ लाख रुपयांच्या फिक्स डिपॉझिटची मुदत संपलेली नसतानाही बोलण्यात गुंतवून एफडीची रक्कम मुदतीपूर्वी परस्पर ऑनलाईन काढून घेण्यात आली.
खारघर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळीविरोधात गुन्हा दाखल करून या टोळीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेली ६८ वर्षीय वृद्ध महिला खारघर सेक्टर-१० मध्ये कुटुंबासह राहण्यास आहे. या महिलेचे पती बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत होते. २०१५ मध्ये ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या पेन्शनमधून त्यांनी ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवी काढल्या होत्या.
एका सायबर टोळीने गत १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास या महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधला. बँक ऑफ इंडियाच्या बीकेसी येथील मुख्यालयातील अधिकारी असल्याचे भासवले. तसेच ही महिला व तिच्या पतीबाबत माहिती सांगितली. त्यामुळे या महिलेने बँकेतील फोन असल्याचे समजून आपल्या पतीला फोन दिला. सायबर टोळीने महिलेच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले.
तसेच त्यांच्या खात्यातून प्रथम १५ हजार रुपये व त्यानंतर ४ लाख ४५ हजार रुपयांच्या मुदत ठेवीची रक्कम परस्पर काढून घेतली. याबाबतचे मेसेज या महिलेच्या मुलीच्या मोबाईल फोनवर गेल्यांनतर मुलीने त्यांच्याकडे याची चौकशी केली. त्यानंतर सायबर टोळीने त्यांच्या मुदत ठेवींची मुदत संपली नसताना सुद्धा तारखेच्या अगोदर मुदतपूर्व ठेवी मोडून ४ लाख ८५ हजारांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. या महिलेने प्रथम एनसीसीआर पोर्टलवर तक्रार दाखल केली, नंतर त्यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.