खोपोली | खोपोली बाजारपेठ समाज मंदीर रस्त्यावर मोटारसायकलवरुनच रस्त्यावर थुंकणार्या तरुणाला महिला दक्षता समितीच्या सदस्या शिल्पा मोदी यांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करताच कर्जतवरुन बोलावून या तरुणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस निरिक्षक शीतल राऊत यांनी दखल घेत कारवाई केल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे. बाजारपेठ समाज मंदीर रस्त्यावरील नजराणा फोटो स्टुडिओसमोरून रविवारी (१२ जानेवारी) रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शिल्पा मोदी चालत जात असतानाच बाजूने असतानाच बाजूने मोटारसायकलवरून तरूण थुंकला.
थुंकी त्यांच्या अंगावर उडाल्याने, समज देण्याचा प्रयत्न केला त्या तरुणाने अरेरावी करत, ‘मी तुमच्या अंगावर तर नाही ना थुंकलो?’ असे उर्मटपणे म्हटले. आजुबाजूचे लोक जमा झाल्याने त्या तरुणाने काढता पाय घेत निघून गेला.
शिल्पा मोदी यांनी सदर घटनेचे माहिती पोलिस ठाण्यात देत मोटारसायकलचा अर्धवट नंबर दिल्यानंतर वरीष्ठ पोलिस निरिक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला असता सदर तरूण कर्जत येथील असल्याची माहिती मिळली. तरूणाला खोपोली पोलिस ठाण्यात बोलावून समज देत खालापूर कोर्टात दंडात्मक कारवाई केली आहे. भविष्यात रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणावर थुंकणार नाही असा शब्द त्या तरूणाने पोलिसांना दिला आहे.