५ कोटी ६२ लाखांचा आराखडा तयार , १ हजार १६ गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश

17 Jan 2025 12:44:21
alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख ६८ हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करुन मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे.
 
या आराखड्यात १ हजार १६ गावे व वड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभमीवर प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
 
या आराखड्यात विहिरी खोल करणे, त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ हजार १६ गावे, वाड्यांवर संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
 
alibag
 
पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट असलेल्या १ हजार १६ गाव-वाड्यांमध्ये अलिबाग तालुक्यातील २० गावे, ३६ वाड्या, उरणमधील ४ वाड्या, पनवेलमधील ३१ गावे, ४४ वाड्या, कर्जतमधील ३५ गावे, ६१ वाड्या, खालापूरातील १४ गावे, ५० वाड्या, पेणमधील ३६ गावे, १५० वाड्या, सुधागडातील १० गावे, १८ वाड्या, रोह्यातील १९ गावे, २९ वाड्या, माणगावातील ६ गावे, २१ वाड्या, महाडमधील २४ गावे, १७९ वाड्या, पोलादपूरातील ४३ गावे, ८१ वाड्या, म्हसळ्यातील १३ गावे, ११ वाड्या, श्रीवर्धनमधील ११ गावे, २४ वाड्या, मुरुडमधील ६ गावे, २१ वाड्या, तळा तालुक्यातील ८ गावे आणि ११ वाड्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतांव्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे पाणी पुरवठा पाइपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी. - डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड
Powered By Sangraha 9.0