सिडको अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात , मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार काढला!

17 Jan 2025 12:56:40
 panvel
 
पनवेल | संजय शिरसाट हे कॅबिनेट मंत्री झाल्याने त्यांचा सिडको अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याची अधिसूचना गुरुवारी (१६ जानेवारी) राज्य सरकारने प्रसिद्ध केली. नगर विकास विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी हा जीआर काढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांत श्रीमंत महामंडळाला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. या ठिकाणी भाजपच्याच पदाधिकार्‍याची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
 
राज्यातील सर्वात मोठे आणि श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोकडे पाहिले जाते. प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आणि नागरी वसाहती विकसित करण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सिडको नोडल एजन्सी आहे. दरम्यान प्रमोद हिंदुराव यांच्यानंतर पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.
 
मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे महामंडळाची सर्व पदे बरखास्त करण्यात आले. तेव्हापासून हे पद रिक्त होते. उद्धव ठाकरे सरकारनेसुद्धा या ठिकाणी अध्यक्ष नियुक्तकेले नाहीत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जवळपास अडीच वर्षे सिडको या पदाच्या प्रतीक्षेत होती. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची या पदावर वर्णी लावण्यात आली होती.
 
शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांकडेअध्यक्ष म्हणून महत्त्वाच्या विषयांवर पाठपुरावासुद्धा केला. त्यांच्या माध्यमातून सिडको अधिक अ‍ॅक्टिव्ह होईल, असे वाटत असताना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर आले. विशेष म्हणजे सिडकोच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. त्यामुळे राज्यातील या सर्वात श्रीमंत महामंडळ असणार्‍या प्राधिकरणाचे अध्यक्ष पदासाठी दुसर्‍याला संधी मिळणार असे बोलले जात होते. गुरुवारी नगर विकास विभागाकडून संजय शिरसाट मंत्री झाल्यामुळे त्यांचा सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात येत असल्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0