कॅबिनेट मंत्री अदिती तटकरेंच्या नावावर फुल्ली ! रायगडातील महायुतीच्या खासदार, आमदारांचा सत्कार...

17 Jan 2025 13:40:21
 khopoli
 
खोपोली | शिवसेना, भाजपा, आरपीआय व मित्रपक्ष कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचीत कॅबिनेट मंत्री, खासदार व आमदारांचा सत्कार सोहळा आज (१७ जानेवारी) आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथे आयोजित केला आहे. या सत्कार सोहळ्याच्या बॅनरवर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे फोटो नसल्यामुळे तटकरे आणि महेंद्र थोरवे वाद सुरुच असल्याची चर्चा आहे.
 
विधानसभा निवडणुकीदरम्यान तटकरे विरुद्ध थोरवे वाद संपूर्ण जिल्ह्याने पाहिला. अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या पाठीशी तटकरेंची अदृश्य शक्ती असल्याचे सांगत, पत्रकार परिषदेतून आ.थोरवे यांनी तटकरेंवर जोरदार टिका केली होती. आ.थोरवे विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर राष्ट्रवादी पक्ष महायुतीत असतानाही माझे मताधिक्य घटविण्याचे काम तुमच्या बापाने केले असा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केला होता.
 
श्रीवर्धनच्या त्या आमदारांचे नावही घेणार नाही, मला त्यांचा तिटकारा आलाय, अशी खिल्ली त्यांनी उडवली होती. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असल्याचे सांगत आदिती तटकरेंच्या नावाला स्पष्टपणे विरोध केल्याने रायगड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांच्या आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होऊन वरीष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली होती.
 
आता रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री, खासदार व आमदारांचा सत्कार सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथे आयोजित केला आहे. या सत्कार सोहळ्यात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविंद्र पाटील, आमदार महेश बालदी यांच्या सत्कार आरोग्य मंत्री प्रकाश आबिकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या बॅनवरवर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या नावावर फुल्ली मारल्याने तटकरे आणि महेंद्र थोरवे वाद सुरुच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0