विजेच्या धक्क्याने देहन नर्सरीचे कृषी पर्यवेक्षक राजेंद्र मांडवडे यांचा मृत्य

17 Jan 2025 13:03:48
 mhasla
 
म्हसळा | विजेच्या धक्क्याने देहन नर्सरी येथील कृषी पर्यवेक्षक राजेंद्र सुखदेव मांडवडे (वय ५७) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१५ जानेवारी) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. रोपांना वीजपंपाने पाणी सुरु करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला.
 
देहन नर्सरीतील मजूर प्रकाश देवजी गिजे याने या घटनेची माहिती म्हसळा पोलिसांना दिली. घटनेचे वृत्त कळताच म्हसळा पोलीस १०८ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. मांडवडे यांना उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सहाणे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
 
राजेंद्र मांडवडे हे गेली अनेक वर्षे म्हसळा तालुका कृषी विभागात आणि फळरोपवाटिका देहेन येथे कार्यरत असल्याने म्हसळा-देहेन ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. मांडवडे मूळचे नाशिकचे रहिवासी असून, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0