माथेरानच्या गावठाणासाठी राज्यपाल सकारात्मक , सुनील गोगटे यांना पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्याची संधी

17 Jan 2025 16:48:31
 KARJT
 
कर्जत | माथेरान शहराची वाढ झालेली असताना १०० वर्षात एकही वाढीव भूखंड माथेरानमधील नागरिकांना मिळालेला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक हे दाटीवाटीच्या ठिकाणी आपल्या घरात राहत आहेत. शासनाने माथेरानमधील ग्रामस्थांसाठी गावठाण क्षेत्राचा विस्तार करावा, अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे देण्यात आले.
 
भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी माथेरानमधील गावठाण विस्तार प्रश्नावर राज्यपालांशी चर्चा केली आणि त्यावेळी राज्यपालदेखील त्याबाबत सकारात्मक असून राज्यसरकारकडे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याचे ओशासन गोगटे यांना देण्यात आले आहे.
 
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माथेरानकरांची घर बांधणे बाबतची भेडसावणारी जुनी समस्या आहे. माथेरान शहरात सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे तेथे बांधकामांना परवानगी दिली जात नाही. माथेरान शहर वसल्यापासून जी काही कुटुंब होती तेवढीच घर आजही तिथे आहेत.
 
तीन-चार पिढ्या झाल्याने लोकसंख्या वाढली एका घरात चार चार भाऊ झाल्याने त्यांना राहण्यासाठी जागा पुरत नाही. त्यांनी जर गरजेपोटी घर बांधण्यास घेतले तर ते अनधिकृत ठरून पाडले जाते. त्यामुळे शहरातील गावठाण विस्तार करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. सुनील गोगटे यांनी यापूर्वी पूर्वीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आम्ही माथेरानवासियांसाठी नवीन घर बांधण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती.
 
त्याचा अनेक दिवस पाठपुरावा करत आहे; परंतु शासन दरबारी त्यावर अजून काही दखल घेतली गेलेली नाही. जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत आपण दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती गोगटेयांनी राज्यपालांना केली. त्यावर राज्यपाल राधाकृष्णन यांनीदेखील हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवत असल्याचे ओशासन दिले.
सुनील गोगटे यांना मान...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या कार्यक्रमाला आले होते. सुरक्षा दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई उतरले.
 
त्यावेळी हेलिपॅडवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी कर्जतचे भाजप कार्यकर्ते भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील गोगटे यांना मोदी यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली. राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यानंतर पाचव्या क्रमांकावर सुनील गोगटे यांना हा बहुमान भाजपकडून देण्यात आला होता.
 
Powered By Sangraha 9.0