शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन , प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणे हीच हुतात्म्यांना आदरांजली

17 Jan 2025 18:17:42
uran
 
उरण | जासई-दास्तान फाटा येथे १९८४ साली शेतकर्‍यांच्या न्यायहक्कासाठी झालेल्या व देशभरात गाजलेल्या आंदोलनात पाच शेतकर्‍यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यानंतर ४१ वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जैसे थे आहेत.
 
त्यामुळे शेतकरी, प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांचे पुनर्वसन, रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे हीच आंदोलनातील हुतात्मे आणि दिवंगत नेते माजी खासदार दि.बां. पाटील यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल, असे विचार मान्यवरांनी गुरुवारी (१६ जानेवारी) हुतात्म्यांच्या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. नवी मुंबई वसविण्यासाठी सिडकोने कवडीमोल भावाने जमिनी संपादीत करण्यासाठी सुरुवात केली होती.
 
संपादीत जमिनीला विरोध करताना शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी जानेवारी १९८४ साली शेतकर्‍यांचे आंदोलन झाले. दिबांच्या मार्गदर्शनाखाली दास्तान व नवघर येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात नामदेव शंकर घरत (चिर्ले), रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम), कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील (पागोटे) यांनी बलिदान दिले.
 
uran
 
शेतकर्‍यांच्या न्यायहक्कासाठी हौतात्म्य पत्करलेल्या पाचही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १६ जानेवारी रोजी जासईत तर १७ जानेवारी रोजी पागोटे येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवारी जासई येथील हुतात्मा स्मारकातसर्वपक्षीय अभिवादन सोहळा पार पडला.
 
याप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, आ.विक्रांत पाटील, माजी खासदार तथा माजी महापौर संजीव नाईक, माजी आ.मनोहर भोईर, माजी आ. बाळाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, कामगार नेते भूषण पाटील, माजी पनवेल नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जेएनपीए कामगार विश्वस्त दिनेश पाटील, रवींद्र पाटील, दिबा पुत्र अतुल पाटील, माजी सभापती नरेश घरत, प्रदेश सरचिटणीस संतोष घरत, जगदीश गायकवाड, प्रितम म्हात्रे, परेश ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत, सीमा घरत,भावना ताई घाणेकर, सरपंच संतोष घरत,वाय टी देशमुख, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, चंद्रकांत घरत, तहसीलदार डॉ.उध्दव कदम, सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, कामगार नेते सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या हेमलता पाटील आजी माजी सरपंच, उपसरपंच यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 
यावेळी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन केले तसेच लोकनेते दिबाच्या पुतळ्यास वनमंत्री गणेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली.यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहताना मनोगतातून शेतकरी, प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांचे पुनर्वसन, रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे हीच आंदोलनातील हुतात्मे आणि दिवंगत नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल.
 
त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याचेही आवाहन करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नव्हे यापुढे लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशीच ओळख विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी होईल. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेणार असून यापुढे कोणालाही संघर्ष करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थितांना दिला.
 
स्थानिक, प्रकल्पग्रस्तांनी समाजहिताची कामे करण्यास सुरुवात केल्यावर त्याठिकाणी सीआरझेड येत असेल तर ते निषेधार्थ असल्याची खंत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना व्यक्त केले. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई शहरात एका कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असताना सिडको स्थानिकांच्या घरावर कारवाई करत असेल तर ते निषेधार्थ असल्याची खंत दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
 
 
Powered By Sangraha 9.0