कर्जत | ‘आम्ही रायगडात केलेली मदत विसरु नका. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा’ असे राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरे यांना सुनावले आहे. दोन दिवसांपूर्वी आम्हाला देशाचे पंतप्रधान यांनी कानमंत्र दिला असून महेंद्र थोरवे यांनी तो पाळल्याचे दिसून येत आल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कर्जतमधील विरोधकांना दवा द्यावी आणि महेंद्र थोरवे यांना दया दाखवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित मंत्री आणि खासदार तसेच आमदार यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी (१७ जानेवारी) कर्जत विधानसभा मतदारसंघ शिवसेना भाजप आरपीआय आठवले पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. कर्जत येथील सीबीसी लॉन येथे आयोजित सत्कार सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरत गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे, पेण विधानसभा आमदार रवींद्र पाटील, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, आमदार महेंद्र दळवी तसेच स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड आदी मान्यवर तसेच या सोहळ्याचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, रामदास शेवाळे, भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड उपस्थित होते.
तीन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान यांनी आम्हाला कानमंत्र दिला आहे. त्याचा पहिला परिणाम आमदार महेंद्र थोरवे आज काही वेडेवाकडे बोलले नाहीत, हे स्पष्टपणे दिसून येते. राजकारणात आणि खेळात कधी काय होईल हे सांगू शकत नाही. आमच्यात धाकधूक होती, पण मागच्या वेळी सोडलेले मंत्रिपद मी घेतले नाही. आमच्या राजाच्या भूमीतील मी मावळा आहे आणि त्यांच्या वागणुकीनुसार मी वागलो आणि मी एकनाथ शिंदे यांना अडचणीत वाढ होऊ नये म्हणून मागे आलो.
आम्हाला आणि महेंद्र थोरवे यांना निवडून दिल्याबद्दल मी धन्यवाद देत असताना मी हात जोडून तुमचे आभार मानतो. आमची नियत आणि निती चांगली आहे, म्हणून आम्ही विजयी झालो. आम्ही रायगडात नसतो तर तुमची काय अवस्था झाली असती? जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा असा जोरदार हल्ला भरत गोगावले यांनी तटकरे यांचे नाव न घेता केला. त्यांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत समझनेवाले को इशारा काफी है, असेही मंत्री गोगावले म्हणाले. भरत गोगावले यांना मंत्री करावे अशी एकच मागणी महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांची होती.
लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहून तुम्ही मतदारसंघात फिरला असता तर जनतेच्या समस्या कळल्या असत्या. तुम्ही ईव्हीएमवर बोट दाखवण्यापेक्षा तुमच्या डोक्यात गेलेली सत्ता आधी बाहेर काढा, असा सल्ला प्रकाश आबिटकर यांनी विरोधकांना दिला.
कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि नेरळ ग्रामीण रुग्णालय यांचे प्रश्न सुटतील आणि उद्घाटन करण्यासाठीच येईल, असा शब्द सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.सरकारी दवाखान्यामध्ये अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून खासगी दवाखान्यात अतिरिक्त खर्च रुग्णांकडून घेतले जाणार नाही यासाठी काम करायचे आहे असा निर्धार आबिटकर यांनी व्यक्त केला. विकास कामांचा झपाटा दाखवा-खा. श्रीरंग बारणे कर्जतची भूमी क्रांतिकारकांची भूमी आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही निवडणुकीत झुंजले.
महेंद्र थोरवे आपण आता निवडणूक होऊन गेली आहे आणि त्यामुळे आता ते बाकीचे विषय बाजूला ठेवून विकासकामांचा आरसा सर्वसामान्य यांच्यापर्यंत न्या अशी सूचना केली. आपले नेते यांना तुमच्या कामाचा झपाटा माहिती आहे आणि त्यांच्याकडून निधी वळवून आणण्याचे काम करू या अशी सूचना केली.
कोळसा काळा आहे हे माहिती आहे-महेंद्र थोरवे कर्जत विधानसभा मतदारसंघात कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय हे १०० बेडचे व्हावे आणि नेरळ परिसरात ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी कर्जत मतदारसंघाचे वतीने आमदार महेंद्र थोरवे यांनी केली. तर तटकरे विषयावर बोलताना आम्ही क्रिझवर पॅड बांधून उभे होतो आणि कोणताही आणि कसलाही बॉल समोर आला तरी टोलवण्याची आम्ही सर्वांनी तयारी केली होती.
मात्र कोळसा काळा आहे हे आपल्याला माहिती आहे आणि तो कोळसा कितीही उगळला तरी तो काळाच असा टोला मारत झाले गेले गंगेला मिळाले, असे मत महेंद्र थोरवे यांनी मांडले. हवा असलेला विकास होतोय -खा.धैर्यशील पाटील पेण मतदारसंघ पूर्वी आमच्यासाठी टेन्शनमध्ये असायचा, पण आम्ही यावेळी रवींद्र पाटील आणि आम्ही एकत्र असल्याने आम्ही टेन्शन मुक्त होतो. आम्हाला जिल्ह्यात कर्जत खालापूर यांची काळजी होती, पण जनतेने खर्या माणसाला निवडून दिले आहे.
कर्जत आणि खालापूर तालुक्यात हवा असलेला विकास महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून सुरू असल्याने आम्हाला आतातरी काळजी नाही, असे खा.धैर्यशील पाटील म्हणाले. हृदयस्पर्शी सोहळा-आ.महेंद्र दळवी कर्जतमधील लढाई कठीण होती, पण महेंद्र थोरवे यांनी शेवटच्या चेंडूवर पाच धावा धावून काढल्या. त्यासाठी कर्जतमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कर्जतची खिंड लढवली आणि त्यामुळे कर्जतमध्ये जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदारांचा हा सोहळा हृदयस्पर्शी होता असे मत महेंद्र दळवी यांनी मांडले.
अदिती तटकरेंना निमंत्रण नाही!
कर्जत महायुतीकडून शुक्रवारी (१७ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित मंत्री, खासदार, आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महायुतीचे मंत्री अदिती तटकरे आणि रायगड लोकसभा मतदारसंघ खासदार सुनील तटकरे यांना निमंत्रण नव्हते.
या सोहळ्याच्या जाहिरातींमध्येदेखील सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालादेखील कोणतेही स्थान देण्यात आले नव्हते. अदिती तटकरे आणि सुनीलतटकरे यांना सत्कार सोहळ्याचे निमंत्रण नसल्याने आगामी काळात हा विषय महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे.