नववर्षाच्या स्वागताला आलेल्या पाहुण्यांना पोलिसांचा पाहुणचार , गांजा ओढणार्‍या पर्यटकांना श्रीवर्धन पोलिसांकडून अटक

By Raigad Times    02-Jan-2025
Total Views |
 shreewardhan
 
श्रीवर्धन | नववर्षाच्या स्वागतासाठी हडपसर पुणे येथून आलेल्या चार तरुणांना श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावरील धुप प्रतिबंधक बंधार्‍यावर गांजाचे सेवन करताना श्रीवर्धन पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. श्रीवर्धन येथे नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटकांनी हजेरी लावली होती.
 
परंतु पुणे हडपसर येथून आलेल्या या तरुणांना त्यांच्या चुकीच्या हरकतीमुळे पोलिसांचा पाहुणचार घ्यावा लागला. सनी चव्हाण वय २७, साहिल सुतार वय २१, सोमनाथ बनसोडे वय २३, आशिष राजगिरे वय १९ आणि शिवा राठोड १९ अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व हडपसर येथील मांजरी बुद्रुक या ठिकाणचे रहिवासी आहेत.
 
या घटनेची पोलीस हवालदार प्रशांत देशमुख यांनी फिर्याद दिली. श्रीवर्धन पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे व्यसनाधीनता करण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना चांगलाच चाप बसणार आहे. सदर पर्यटकांकडे गांजा हा अंमली पदार्थ कोठून आला? त्यांनी कसा प्राप्त केला? याबाबतदेखील पोलीस चौकशी सुरू आहे.
 
या तरुणांना श्रीवर्धनच्या मुख्य समुद्रकिनारी होडी व कोळी पुरुष व महिलेच्या स्टॅच्यूजवळ सिमेंटच्या कट्ट्यावर बसून गांजा पित असताना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक यु.बी. रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जे. जी. गमाले हे अधिक तपास करीत आहेत.