पाली/बेणसे | रायगड जिल्ह्यातील कोणत्याही डोंगरमाथ्यावर, माळरानावर, रस्त्याच्या कडेला अथवा शहर व गावातही बारीक पांढरी फुलांनी बहरलेली दाट हिरवी झुडपे पाहायला मिळत आहेत. रानमोडी म्हणून परिचित असलेली ही वनस्पती तिच्या नावाप्रमाणे रान मोडत आहे.
झपाट्याने वाढणारी ही परदेशी वनस्पती पूर्णतः निरोपयोगी असून अन्य स्थानिक झाडे आणि गवताच्या वाढीसाठी अडथळा ठरत आहे. शिवाय जैवविविधतेला तिच्यामुळे धोका असल्याने वनविभाग, पर्यावरणप्रेमी व निसर्ग अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या या वनस्पतीमुळे वाहतुकीला अडथळा देखील होत आहे.
मागील १० ते १२ वर्षांत या रानमोडीने संपूर्ण रायगड जिल्ह्याचे बहुतांश क्षेत्र व्यापले आहे. तिचे परागकण व बारीक पाकळ्या मोठ्या प्रमाणावर हवेत पसरत असल्याने अनेकांना श्वसननाचा त्रासदेखील होतो. पावसाळा संपल्यानंतर अनेक झुडपे आणि विविध प्रकारचे गवताची वाढ थांबते किंवा त्या मरण पावतात.
परंतु रानमोडीची दाट हिरवाई कायम आहे. पांढर्या रंगाची बारीक फुले त्यावर उमललेली असल्याने ती सर्वांचे लक्ष वेधत आहेत. अनेकांना हा निसर्गाचा चमत्कार वाटत असला तरी त्याचे दुष्परिणाम मोठे आहेत. ते अनेकांना ही माहीत नाही. पर्यावरण अभ्यासक प्रवीण कवळे, सागर दहिंबेकर, शंतनू कुवेसकर यांच्यासह अनेक निसर्ग अभ्यासकांनी त्याला दुजोरा दिला आहे.
परदेशी वनस्पती
रानमोडी ही मूळची अमेरिकन झुडूपवर्गीय सूर्यफूल कुळातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव क्रोमोलेनिया ओडेरेटा असे आहे. रानमोडी दीड ते दोन मीटर उंच वाढते.
रानमोडीमुळे इतर झाडांच्या वाढीला आळा बसतो. तर छोटी स्थानिक झाडे व झुडपे आणि गवत यांना पोषकद्रव्ये व पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्यांची वाढ खुंटते. अत्यंत निरुपयोगी असलेली ही वनस्पती गुरे देखील खात नाहीत. तर मधमाशा, भुंगे, पक्षी, फुलपाखरू व कीटक यांना याचा काही उपयोग होत नाही. परिणामी या झुडपांच्या बेसुमार वाढीमुळे जैवविविधता आणि पर्यावरण धोयात येत आहे. -समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग