कर्जतमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारुन तरुणाची आत्महत्या

By Raigad Times    20-Jan-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. स्वप्निल सुरेश सावंत असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सुधागड पाली येथील राहणारा आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ असणार्‍या डिकसळ परिसरातील डायमंड या सोसायटीत स्वप्नील सुरेश सावंत हा आपल्या आई आणि आजीसोबत गेल्या सहा महिन्यांपासून रहायला आला होता. वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपल्यानंतर तो कर्जत येथे आपल्या मामाकडे आला.
 
त्यानंतर त्याने डिकसळ येथे भाडे तत्त्वावर राहण्यास सुरुवात केली. भाऊ बहीण नसल्याने आई आणि आजीची सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. कर्जत येथे घुमरे यांच्याकडे तो कामाला होता. रात्री तो नेहमीप्रमाणे घरी आला. रोजच्या सहकार्‍यांना आवाज देत तो घरी गेला होता.
 
रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास येथील रहिवासी मनसेचे अक्षय महाले यांना काहीतरी पडण्याचा आवाज आला असता, स्वप्नील इमारतीच्या टेरेसवरुन पडुन जखमी अवस्थेत होता. जखमी स्वप्नीलला उचलून अक्षय महाले यांनी ताबडतोब जवळील रायगड हॉस्पिटल येथे नेले; परंतु हॉस्पिटलच्या दारावरच स्वप्नीलने अखेरचा श्वास घेतला. घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.