जिल्ह्यातील बौद्ध लेण्यांचा होणार विकास , अदिती तटकरे यांनी केली पाहणी

20 Jan 2025 16:45:35
alibag
 
अलिबाग | बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना सुलभ पर्यटन करता यावे, यासाठी राज्यात २५ पर्यटनस्थळे निवडण्यात आली आहेत. बुद्धिस्ट सर्किट पर्यटन मार्ग तयार करण्यात येणार असून यामध्ये रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कुडा लेणी, महाड तालुक्यातील गांधारपाले या लेण्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
 
यामुळे जिल्हयातील बौदध लेण्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेतून या दोन्ही ठिकाणी पर्यटनासंदर्भातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच बौद्ध धर्माचा प्रचार होण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत कुडा लेणीची पहाणी केली.
 
ऑगस्ट २०२१ मध्ये अदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कुडा लेणी, आणि गांधारपाले लेण्यांचा समावेश यावेळी अधिकार्‍यांबरोबर चर्चा करताना आदिती तटकरे यांनी प्रस्ताव केंद्र शासनाकडे मांडला होता. त्यावेळेही अधिकार्‍यांसमवेत या लेण्यांची पाहणी करत विकास कामांचा आराखडा मांडण्याच्या सूचना केल्या होत्या.
 
राज्यातील २५ बौद्ध धर्मियांच्या स्थळांचा बुद्धिस्ट सर्किट अंतर्गत समावेश करण्यात आला असून यासाठी प्रत्येकी १० कोटी निधी मिळणार आहे. यात बौद्ध धर्मियांच्या इतिहास अभ्यासाला प्रोत्साहन देणे, देशविदेशातील पर्यटकांना या स्थळांच्या आभ्यासासाठी आमंत्रित करणे आणि या स्थळांचा जास्तीत जास्त पर्यटनासाठी प्रचार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
 
कोकणातील बौद्ध लेण्यांचे महत्व
भारतात स्थापन झालेल्या बौद्ध धर्माचा प्रचार एक हजार वर्षापूर्वी जगभरात झाला. जगभरातील बौद्ध प्रचारक सागरी मार्गाने पुन्हा भारतात येताना मुंबईतील जोगेश्वरी लेणी, कुडा, गांधारपाले या लेण्यांमध्ये काही काळ विश्रांती करत आणि पुढील प्रवासाला सुरुवात करत, त्यामुळे या लेण्यांचे महत्व बौद्ध धर्माच्या प्रचारात महत्वाचे मानले जाते. या लेण्यांच्या परिसरात अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या असल्याने त्याचा शोध घेण्याचे कुतुहल इतिहास अभ्यासकांना आहे.
 
वेरुळ व अजिंठा लेण्यांना भेट व पर्यटनासाठी बौद्ध अभ्यासक मोठ्या संख्येने छत्रपती संभाजीनगरला येतात. यातील काही पर्यटक कोकणातील या स्थळांनाही भेट देत असतात. या पर्यटनातून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. - आदिती तटकरे, महिला आणि बाल कल्याण मंत्री
 
 
 
Powered By Sangraha 9.0