अलिबाग | पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर रायगडात शिवसेना आमदारांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘पालकमंत्री नाही बालकमंत्री’ अशी टिका त्यांनी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करताना ‘बाप तो बाप रहेगा’चे स्टेटस ठेवून शिवसेनेला आणखी डिवचले आहे. एकंदरीत राज्यात महायुतीतील घटक असलेल्या शिवसेनाराष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
रायगडात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे, अशी भूमिका सुरुवातीपासूनच शिवसेना आमदारांची राहिली आहे. उध्दव ठाकरे सरकारमधून बाहेर पडताना हाच विषय त्यांनी पुढे केला होता. नंतर एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळाले नाही; मात्र पालकमंत्रीपद शिवसेनेकडे ठेवण्यात यश आले.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात आल्यानंतर मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ पहायला मिळाली. शेवटी राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे यांची कन्या राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. अदिती तटकरे यांचे नाव जाहीर होताच शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली.
शिवसेना कार्यकर्त्यांनी तर मुंबई-गोवा महामार्ग काही काळासाठी अडवून ठेवला. ‘रायगडला बालकमंत्री नको, पालकमंत्री हवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. दक्षिण रायगडसह कर्जत, खालापूर, माथेरान, खोपोलीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आंनद साजरा करण्यात आला.
ख़ुशी का माहोल है, लेकीन सेने मे नाराजी का माहोल बना है, सौ सुनार की एक लोहार की? बाप तो बाप होता है...अशा एक ना अनेक आशयाचे स्टेटस् राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झळकवून शिवसेनेला आणखी डिवचले आहे. एकंदरीत पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आले असले तरी, या पदावरुन रायगडात दोन मित्रपक्षांत जोरदार राडा सुरु आहे.
पालकमंत्रीपदाचा हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. त्यामुळे जो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला आहे. त्या निर्णयाचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेना भाजपचे सहा आमदार आहेत. या सहाच्या सहा आमदारांनी, रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माझे नाव सुचवले होते. भरत गोगावले हेच पालकमंत्री व्हावेत, अशी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचीही भावना होती. मात्र, आता जे केले ते अनपेक्षित आहे. पण ठीक आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल, असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही महायुतीच्या प्रमुख तीनही नेत्यांनी दिलेली आहे. त्यामुळे महायुतीच्या सहकार्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. भरत गोगावले हे आमचे सहकारी मंत्री आहेत. त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. आता ते मंत्री म्हणून देखील काम करत आहेत. त्यामुळे आम्ही व्यवस्थितपणे समतोल राखून काम करु आणि रायगड जिल्ह्याला कशा पद्धतीने पुढे नेता येईल? यासाठी काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया अदिती तटकरे यांनी माध्यमांत दिली आहे.