इलेट्रिक डी.पी मधून लाखो रुपये किंमती तांब्याची तार चोरीला , अनेक दिवस गावं अंधारात

20 Jan 2025 19:15:48
 roha
 
रोहा | थंडीत गारवा पडल्यानंतर ग्रामीण भागात इलेट्रिक डी पी मधील ऑइल काढून त्यातील लाखो रुपये किंमतीची तांब्याची तार चोरीला जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने ग्रामस्थ वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, इलेट्रिक डी पी मधून तांब्याची तार काढल्यानंतर सदर डी पी निकामी होते.
 
आणि निकामी डीपी झाल्यानंतर त्यातून विद्युत प्रवाह खंडीत होत असल्याने संबधित गावे तीन चार दिवस अंधारात बुडल्याने ग्रामस्थांना अनेक अडचनींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे तांब्याची तार चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वीज वितरण कंपनीला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे.
 
रोहा विरजोली मार्गावरील हाल खर्डी गावाला वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून इलेट्रिक डी पी ची व्यवस्था करण्यात आली होती.असे असताना १ ते १५ जानेवारी या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रात्री अंधाराचा फायदा घेऊन डीपी मधून वीज पुरवठा खंडीत करून त्यामधील जवळपास १ लाख ६५ हजार रु. किंमतीची तांब्याची बायडींग केलेली तार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
डीपी निकामी झाल्यानंतर गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने गावात अंधारमय वातावरण पसरले आहे. या बाबत वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता रोशन अरुण धनवीज यांनी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान कोलाड भागातील खांब येथील साईनगर मध्ये तांब्याची कॉईल चोरीचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर गावात तीन दिवस वीज पुरवठा खंडीत झाला होता. ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात या घटनेची माहिती दिली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0