आयुष्याचे ध्येय

20 Jan 2025 19:44:18
 sampadakiya
 
नवीन वर्षाचा जानेवारी महिना अजून संपायचा आहे. महिन्याच्या पहिल्याचपंधरवड्यात बहुसंख्यांचे संकल्प वाहून गेले असतील. यासाठी कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. अनेकांचा वर्षानुवर्षांचा तो अनुभव आहे. नवसंकल्पांचा जोर जेमतेम काही दिवस टिकतो. पण दृढ निश्चयाने तो पूर्ण करणारे अगदीच विरळ आढळतात. याचे कारण बहाणेबाजी आणि कारणे सांगण्याच्या सवयीत, आळशीपणात दडलेले असू शकेल.
 
रोज लवकर उठावे, व्यायाम करावा, रस्त्यावर तयार केले जाणारे बाहेरचे अन्नपदार्थ जास्त खाऊ नये असे आरोग्यासाठी जरी चांगले बदल कोणी सुचवले की कारणे सांगण्याची सवय डोके वर काढते. एवढेच कशाला अगदी महिन्यातून एकदा भेटणेसुद्धा माणसे बहाणेबाजी करून टाळताना आढळतात. वेळ नाही, परिस्थिती खराब आहे, आर्थिक क्षमता नाही, कामामुळे जमत नाही, बरे वाटत नाही ही नेहमीचीच कारणे. या सवयीमुळे धडधाकट माणसेसुद्धा रडतराऊ बनतात.
 
तथापि समाजात अशीही काही माणसे आहेत, जी जिद्दीने शारीरिक आणि त्यामुळे येणार्‍या मानसिक कमतरतेवर मात करतात. जगण्याचा आनंद घेतात. आयुष्य भरभरून जगतात. अशा विजिगिषू वृत्तीच्या माणसांची एक राष्ट्रीय स्पर्धा सध्या विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या स्पर्धेत ज्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही, उठबस करता येत नाही, ज्यांना मस्युलर डिस्ट्राफी, सेरेब्रल पाल्सी आणि लोकोमोटर आजारांनी जखडले आहे अशी माणसे सहभागी झाली आहेत.
 
जीवाची बाजी लावून पदके जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक अंध खेळाडूंचा नाशिकमध्ये नुकताच सत्कार करण्यात आला.परिस्थितीला दोष देणे किंवा कारणे त्यांना शय होते आणि तसे त्यांनी केले असते तर ते समजूनही घेतले गेले असते. पण त्यांनी तसे केले नाही. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्याचे ध्येय ठरवले आहे. विपरीततेवर मात करण्याचा संकल्प केला आहे. ज्यांना कोणतीही हालचाल करण्यासाठी मदत लागते किंवा ज्यांचे आयुष्य चाकाच्या खुर्चीला जखडले आहे अशा या माणसांकडून समाज खूप काही शिकू शकेल.
 
पण वास्तव वेगळेच आढळते. बहुसंख्य माणसे त्यांचा वेळ मोबाईलवर वाया घालवतात. वायफळगप्पांमध्ये रमतात. अनेकांना ध्येयच नसते. सरधोपट आयुष्य करणे सांगत जगणे हीच वृत्ती आढळते. पण परिस्थिती कशीही असली तरी सकारात्मक मानसिकता त्यावर मात करू शकते, याची ही काही चपखल उदाहरणे आहेत. हे जीवन सुंदर आहे असेच ते सांगू पाहतात. जिद्द-दृढ निश्यय-कष्ट उपसण्याची तयारी असेल तर ‘किनारा तुला पामराला’ असे जगणे शय आहे हेच त्यांनी सिद्ध केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0