पाली | शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे. पक्षासाठी आवश्यक वेळ देता येत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश देसाई यांनी शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे, पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
आपण कुणावरही नाराज नसल्याचे सांगतानाच, एक खंत देखील व्यक्त केली आहे. काही लोकांनी पक्षात पदे अडवून ठेवली असून पक्षाच्या कामात सुसूत्रता दिसत नाही. नेतृत्वगुण व कार्य नसलेल्या व्यक्तींना पदे दिली जात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात पक्षवाढीसाठी पोषक वातावरण असताना सुधागड तालुक्यात शिवसेनेला खीळ बसली असून याची कारणमीमांसा होणे गरजेचे असल्याचे देसाई म्हणाले.
पक्षाचे संपर्क प्रमुखपद हे अतिशय मोठे व जबाबदारीचे पद आहे, या पदाचा अर्थ वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माझ्याकडे थेट शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुखपद मोठ्या विश्वासाने सोपवले गेले, त्यापदाला मी न्याय देण्याची भूमिका ठेवली. मुरुड नगरपरिषद व पाली सुधागड पंचायत समितीवर भगवा फडकावण्याचे काम केले.
खर्या अर्थाने शिवसेना नेते भरत गोगावले व महेंद्र दळवी यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला, तो विश्वास कायम सार्थकी ठरविला असल्याचे प्रकाश देसाई यांनी सांगितले. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांची वर्णी लागली यावरदेखील देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली, ते म्हणाले की, रायगड जिल्ह्यात वरिष्ठतेनुसार अनुभव व राजकीय सामाजिक योगदान तसेच संख्याबळाच्या पाठिंब्याच्या जोरावर मंत्री भरत गोगावले हेच पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत, अशातच मंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्याने संपूर्ण महाडसह जिल्ह्यात शिवसैनिकांत असंतोष दिसून येत आहे. पदाचा राजीनामा दिल्यानंतर, मी सध्या वेट अँडच्या भूमिकेत राहणार आहे. कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याशी विचारविनीमय करून पुढील निर्णय घेवू, असे शेवटी देसाई यांनी म्हटले आहे.