शेअर मार्केटमध्ये फसवणूक करणार्‍या भामट्याला सायबर पोलिसांनी केले जेरबंद

20 Jan 2025 18:29:31
 panvel
 
पनवेल | शेअर मार्केट ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून खारघर येथील बांधकाम व्यावसायिकाला तब्बल १४.८९ कोटी रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणार्‍या टोळीतील एका आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बिहार राज्यातून अटक केली आहे.
 
सुजितकुमार मदनकुमार सिंग असे या आरोपीचे नाव असून त्याने कंबोडिया देशात जाऊन तेथील चाईनीज लोकांच्या संपर्कात राहून अनेक लोकांची सायबर फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर पोलिसांनी आता या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.
 
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सुजितकुमार सिंग याने आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींनी २०२४ मध्ये संगनमत करुन खारघर भागातराहणार्‍या बांधकाम व्यावसायिकाला शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगमध्ये जास्तीचा फायदा असल्याचे भासवले होते.
 
तसेच त्यात जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यवसायिकाकडून ऑनलाईन पद्धतीने तब्बल १४ कोटी ८९ लाख रुपये उकळले होते. याबाबत नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर टोळी विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या गुह्यात वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. या तपासात आरोपी सुजितकुमार हा बिहार येथे असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली.
 
सदर माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने बिहार राज्यात जावून सुजितकुमार सिंग याला ताब्यात घेतले. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो दोन वेळा कंबोडिया देशात गेल्याचे आणि त्याचा या गुह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने या आरोपीची ५ दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. प्राथमिक तपासात सुजितकुमार सिंग भारतातील इतर काही व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले असून त्यांचा सायबर पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0