भररस्त्यात चौकडीने कंटेनर चालकासह दोघांना लुटले! कळंबोलीतील घटना

22 Jan 2025 18:19:47
 new mumbai
 
नवीन पनवेल | कारमधून आलेल्या चार लुटारुंनी कंटेनर चालक आणि कंपनीच्या सुपर वायझरला लुटल्याची घटना वूडलँड कंपनी सिग्नलकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरज कुमार राऊत हा कळंबोली येथे राहत असून १५ जानेवारी रोजी त्यांच्या कंपनीच्या कंटेनरमध्ये कुरिअरचा माल भरून दिलीप कुमार हे गुडगाव येथे जाण्यासाठी निघाले.
 
पनवेल मुंब्रा रोडने कळंबोली बीमा कॉम्प्लेक्स समोरील ओवर ब्रिजवरून वुडलँड कंपनी सिग्नलकडे जाणार्‍या रोडने जात असताना त्याने अ‍ॅडव्हान्सची मागणी केली. यावेळी सुरज कुमार हे अ‍ॅडव्हान्स देण्यासाठी स्कुटी घेऊन त्या ठिकाणी गेले आणि कंटेनरमध्ये ड्रायव्हर सीटवर बसले यावेळी हिशोब करत असताना स्विफ्ट डिझायर कारमधील चालकाने तीन-चार वेळा हॉर्न वाजवला.
 
यावेळी तीन अनोळखी ईसम कंटेनरकडे धावत आले आणि छोटा चाकू आणि स्क्रू ड्रायव्हर दाखवून मोबाईल आणि पैसे द्या असे बोलला. यावेळी विरोध केल्यानंतर चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरने सूरज कुमार याच्या छातीवर वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्याजवळील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा ७० हजारांचा ऐवज घेऊन ते पळून गेले. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चार लुटारुंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0