जेएसडब्ल्यूच्या विद्युत टॉवर लाईनला पेण येथील शेतकर्‍यांचा विरोध , शेतकर्‍यांचा आमरण उपोषणाचा इशारा

23 Jan 2025 18:06:37
 pali
 
पाली | जेएसडब्ल्यू कंपनीची ४०० केवीएस विद्युत टॉवर लाईन शेतातून नेण्यास नागोठणे परिसरातील शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवा; अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. जेएसडब्ल्यूच्या विद्युत टॉवरचे काम निडी भागात सुरु आहे.
 
बुधवारी (२२ जानेवारी) शेतकर्‍यांनी धडक देऊन सदरचे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली. यावेळी शेतकर्‍यांनी जेएसडब्ल्यूविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जेएसडब्ल्यू प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याआधी जेएसडब्ल्यूची टॉवर लाईन व पाईपलाईन जाताना काही शेतकर्‍यांना मोबदला मिळाला नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहेत.
 
तसेच अनेक ठिकाणी मध्ये- मध्ये टॉवर उभे करून शेतकर्‍यांवर अन्याय केला असल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे आता जी टॉवर लाईन टाकली जात आहे, याबदल्यात शेतकर्‍यांना अत्यल्प मोबदला देऊन शेतकर्‍यांची फसवणूक केली जात असल्याचे संजय म्हात्रें यांनी म्हटले आहे. जेएसडब्लूसाठी कानसईपासून शेतकर्‍यांच्या शेतामधून टॉवर लाईन जात असल्याने कोलेटी, खार कोलेटी निगडे, आमटेमसह विभागातील शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
 
याबाबतचे निवेदन शेतकर्‍यांनी रायगड जिल्हाधिकारी व मंत्रालय स्थरावर दिलेले आहेत. यात शेतकर्‍यांचे मेडिकल इन्शुरन्स काढण्यात यावेत, संबधीत गावे कंपनीने दत्तक घ्यावीत याहस अनेक मागण्या शेतकर्‍यांनी केल्या आहेत. टॉवर लाईन जात असलेली शेतजमीन व सभोवतालच्या शेत जमिनीत भविष्यात कोणताही प्रकल्प स्थापित होणे अशक्य आहे. या टॉवर चा मानवी आरोग्यास व जैविधतेला देखील मोठा धोका असल्याचे मत शेतकरी जनार्दन शिवराम नाईक यांनी व्यक्त केले आहे.
 
शेतकर्‍यांवर अन्या झाला तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी शिवसेना रायगड जिल्हा युवाप्रमुख संजय म्हात्रे, कोलेटी सरपंच राजू भोईर, उपसरपंच बाबू तांबोळी, लक्ष्मण तांबोळी, प्रवीण ताडकर, यशवंत मोकल, बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष जनार्दन नाईक, एच.ए. म्हात्रें, पी.पी. म्हात्रें, गणेश म्हात्रे, विजय म्हात्रें, प्रणित कार्लेकर, यशवंत मोकल, दत्ता मढवी, आदींसह शेतकरी उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0