कळंबोली | विधानसभा निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणून राज्यातील करोडो महिलांना सरसकट दरमहा पंधराशे रुपये दिले अन् भरभरून मतेही मिळवली; परंतु आता शासनाच्या तिजोरीत खडखड असताना पैसे द्यायचे कसे? त्यामुळे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे यांनी अपात्र बहिणींकडून पैसे वसूल करण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची कोणतीही शहनिशा शासनाने न करता मतांच्या लालचे पोटी सरसकट लाडक्या बहिणींना पैसे देऊन जर आता ‘गरज सर्व वैद्य मरो’च्या म्हणीनुसार अपात्र बहिणींकडून पैसे परत घेणार असाल तर आमच्याकडून भरभरून घेतलेली मतेही परत करा असा इशारा कळंबोलीतील कल्पना हनुमंत मोटे या गृहिणीने दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणीने चांगलाच करिष्मा दाखवून भरभरून मते देऊन महायुती शासनाला चांगलेच बहुमत दिले. पंधराशे रुपये मिळालेल्या लाडक्या बहिणींनी ही महायुतीच्या पदरात महा मतदानाचे दानही चांगलेच केले. लाडक्या बहिणीचे श्रेय घेण्याची चढाओढ महायुतीतील पक्षांमध्ये सुरू झाली. राज्याच्या तिजोरीवर कित्येक लाखो कोटींचे कर्ज असतानाही राज्यकर्त्यांनी मते मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना देण्याची घोषणा केली.
चार ते पाच महिन्याचे पैसेही महिलांच्या खात्यावर जमा केले . राज्याच्या तिजोरीतल्या खडखटामुळे विकास निधी मिळणे दुरापास्त होत आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना सरसकट पैसे न देता त्यांच्याकडे दुचाकी चार चाकी गाडी नाही, संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही अशाच महिलांना लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.
तसेच ज्या अपात्र लाडक्या बहिणींनी शासनाचे पैसे पात्र नसताना घेतले आहेत त्यांच्याकडून वसूल केले जातील किंवा त्यांनी स्वतःहून येऊन शासनाला परत करावेत व आपले अर्ज बाद करावेत असा इशारा दिला आहे. अन्यथा अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले. शासनाने व महायुती तील घटक पक्षांनी आमची एक प्रकारे फसवणूकच केली असल्याची संताप जनक भावना कळंबोलीतील महिलांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे ज्याप्रमाणे आमच्याकडून लाडक्या बहिणी योजनेचे आमिष दाखवून भरभरून मते घेऊन सत्ता स्थानी विराजमान झाले. आता लाडक्या बहिणींची गरज संपली अन गरज सरो वैद्य मरो या तत्त्वाने लाडक्या बहिणींनी घेतलेले पैसेही वसूल करण्याचा तगादा जर शासन लावत असेल तर सत्ता स्थानी बसण्यासाठी या अपात्र लाडक्या बहिणीने दिलेली मते आहेत ती मते ही अपात्र लाडक्या बहिणींची परत करा अशी संताप जनक भावना कळंबोलीतील सामाजिक कार्यकर्त्या व गृहिणी कल्पना हनुमंत मोटे यांनी व्यक्त केली आहे.
अपात्र लाडक्या बहिणींच्या घरी जरी चार चाकी असली दुचाकी असली तरी काही चारचकी ह्या व्यवसायासाठी घेतलेले आहेत. सद्यस्थितीत आधार कार्ड पॅन कार्ड हे सर्वत्र संलग्न असताना शासनाने पैसे देण्याची मग घाई का केली असा परखड सवाल कल्पना मोटे यांनी उपस्थित करून शासनानेच लाडक्या बहिणींची आता फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. याचा हिसका हा आगामी होणार्या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी दाखवल्या शिवाय राहणार नाहीत असा संताप जनक इशाराही त्यांनी व्यक्त केला आहे.