पेण | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील वडखळ बाजुकडून नागोठणे बाजूकडे जाणार्या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालविताना वाहन चालकांना खबरदारी घ्यावी लागत आहे. कोणाचा नाहक बळी गेल्यानंतर हा खड्डा भरला जाईल काय? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासीवर्गातून व्यक्त केली जात आहे.
वडखळ बाजुकडून नागोठणे बाजुकडे जाणार्या महामार्गावरील असलेल्या आनंदनगर (देवळी)-करंजे टेप (कासू) या दोन गावांच्या मध्यभागी महामार्गावर मोठा खड्डा पडला आहे. यामुळे वाहन चालविताना वाहनचालकांना खबरदारी घ्यावी लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन असंख्य नागरिक ये-जा करीत असतात तसेच आजूबाजूच्या परिसरात असणार्या कंपनीत काम करणारे कामगार, तसेच रोहा, नागोठणे, महाड कडे जाणारे प्रवासी याच मार्गाने प्रवास करीत असतात.
परंतु या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एखाद्या बाईकस्वार हा खड्डा चुकविण्याच्या नादात पडून कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर रस्ताचे काम करणार्या ठेकेदार कंपनीने याकडे लक्ष देऊन हा खड्डा भरण्यात यावा अशी मागणी प्रवासीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.