शिवसेनेच्या तिन्ही आमदारांचा खा.तटकरेंवर हल्लाबोल

24 Jan 2025 17:04:50
pali
 
पाली | हिंमत असेल तर श्री बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगा, आम्हाला तिघांना पाडण्याचा प्रयत्न कुणी केला, कुणाला कुणी फसवलं? असे आव्हान कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादचे नेते सुनील तटकरेंना यांना दिले आहे. जो स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही, तो तुमचा आमचा काय होणार ? अशी जहरी टीका गोगावले यांनी तटकरे यांच्यावर केली आहे.
 
पाली उन्हेरे येथे गुरुवारी, २३ जानेवारी रोजी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांचा सत्कार सोहळा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी आणि आ. महेंद्र थोरवे या तिघांनीही राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. आमच्या विरोधात चुकीच्या पध्दतीने कोणी जाते, त्यांचे पुढे काय होते हे सर्वांना माहीत आहे असे विधान राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केले होत.
 
तोच धागा पकडत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या (तटकरे) विरोधात जाणारे हे मिंधे असतील, आम्ही कोणाचे मिंधे नाहीत, आम्ही आमच्या पक्षाचे निष्ठावंत आहोत. बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत. आम्ही कोणी येर्‍या गबाळ्याचे सैनिक नाहीत. आमच्या विरोधात पाहिले कोण गेले. त्याची पहिले चौकशी करा? आम्हा तिघांना पाडण्याचा प्रयत्न सुनील तटकरे यांनी केला याचा पुनोरच्चार गोगवले यांनी केला.
 
मला पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले, ताकद दाखवून दिली, आम्ही एकत्र झाल्यानंतर काय करू शकतो, हे दाखवले. त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा. आम्हाला आमच्या नेत्यांना व पक्ष संघटनेला अडचणीत आणायचं नाही. पण वस्तुस्थिती दिसते तेव्हा डोळे झाकायचे नसतात, पेटून उठायची शिकवण आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
आमदार महेंद्र दळवी यांना एकदा तटकरेंनी फसवले, तरीदेखील ते त्यांच्याजवळ जात होते, महेंद्र थोरवे हा मावळा हिमतीने लढत होता. पाली बल्लाळेश्वराकडे मी मागणे मागून आलोय, पालकमंत्रीपद मिळावे म्हणून. आमच्यावर बल्लाळेश्वराची कृपा होईल, असे गोगावले म्हणाले. मी चार वेळा आमदार झालो, ते दोन वेळा आमदार, जमिनीवर चालायला शिकले पाहिजे. हवेत चालून जमत नाही, असा टोला तटकरे यांना लगावला.
प्रकाश देसाई यांचे नाव न घेता भाष्य..
आजचा पक्षप्रवेश सोहळा संघटनेला ताकद देणारा आहे. कुणी एकजण सोडून गेला तर पक्ष संपत नाही तर जोमाने वाढतो, असे मंत्री गोगावले म्हणाले. नव्याने नियुक्ती केलेल्या रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख यांनी सर्वांना सोबत घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन केले.
मिलिंद देशमुख यांची रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदी नेमणूक
माजी तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख यांच्यावर शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली, तसे नियुक्तीपत्र मंत्री भरत गोगावले व अन्य आमदारांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. यावेळी मिलिंद देशमुख यांच्यासह तिवरे ग्रामपंचायत सरपंच दिनेश पवार, उपसरपंच अजय देशमुख व अन्य दहा सदस्य, नवघर उपसरपंच संजय मोरे, राम चव्हाण आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवा खांद्यावर घेतला.
 
यावेळी प्रास्ताविकात शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी सुधागड तालुक्यातील जनतेला भेडसावणारे मूलभूत प्रश्न व समस्यांना सोडवून जनतेला अपेक्षित न्याय देण्याची भूमिका मांडली केली. यावेळी रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी, सुधागड तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख, शिवसेना युवा जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे, संदीप दपके, निलेश घाटवळ, नाना देशमुख, नगराध्यक्ष प्रणाली शेळके, सरपंच कल्पना म्हात्रे सर्व नगरसेवक व नगरसेविका, शिवसैनिक उपस्थित होते.

pali
 
तुमचे संस्कार अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत - आ.महेंद्र थोरवे
अन्याया विरोधात बाळासाहेब लढले, तोच विचार घेऊन आम्ही लढतोय. विरोधक हे शिवसेनेचे खच्चीकरण करायला पाहत आहेत, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, अन्यायाविरुद्ध आम्ही पेटून उठलो, मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
 
तटकरे आमचे संस्कार काढतात; पण तुमचे संस्कार अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत, असा टोला कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी लगावला. आम्ही संस्कृती व सामाजिक बांधिलकी जपतोय, आम्ही स्वाभिमानाने रायगड जिल्ह्यात आमचे वर्चस्व प्रस्थापित करू, आगामी सर्व निवडणुकीत शिवसेना आपला करिष्मा दाखवून देऊ, असा विश्वास आमदार थोरवे यांनी व्यक्त केला.

pali
 
आमच्या जीवावर तटकरे निवडून आले आणि आमच्याच विरोधात त्यांनी काम केले-आ.महेंद्र दळवी
लोकसभेला आमच्या जीवावर तटकरे निवडून आले; मात्र त्यांनी माझ्याविरोधात काम केले. शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्याने शेकापला संपवले, तुमच्यावरही ती वेळ येईल. तटकरे यांची जादू आता संपली आहे, त्यांची घराणेशाही यापुढे चालणार नाही, अशी टीका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.
 
आम्ही यापूर्वीही पालकमंत्री पदाला विरोध दर्शवून उठाव केला होता. आम्ही काही झालं तरी राष्ट्रवादीला स्वीकारणार नाही, ही भूमिका घेतली आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्यासाठी आम्ही शिवरायांचे मावळे ताकदीने रस्त्यावर उतरू, असेही आ. दळवी यांनी म्हटले आहे.
 
बॅरिस्टर अंतुले यांनी ज्यांना आशीर्वाद दिला, त्यांचे पुढे काय झाले हे रायगडकरांना माहिती आहे. तटकरे हे सुसंस्कृतपणाबद्दल वारंवार सांगतात, मात्र ते सर्वांना कमी लेखतात, अशी टिका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे. तटकरे यांची विधाने बालिश बुद्धीची असल्याचा टोला आ. दळवी यांनी मारला आहे.
 
Powered By Sangraha 9.0