खोपोली | पालकमंत्र्याला एवढं महत्व असते हे कधीच समजले नव्हते. पालकमंत्री पदावरुन सध्या वाद सुरू झाल्यानंतर महत्व समजलं आहे. पालकमंत्रीपदाचा वाद रस्त्यावरून सुटणारा नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दालनात सुटणारा प्रश्न आहे. ‘मी मारतो, तू थोपट’ असे तटकरे आणि गोगावले करीत असल्याची टिका शेकाप नेते जयंत पाटील यांनी दोघांचेही नाव न घेता केली आहे.
महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती जाहीर होताच शिवसेनेचे आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी यांनी तटकरेंना विरोध करीत मंत्री भरत गोगावले यांचीच रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती व्हावी अशी मागणी केली आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दबाव वाढावा, यासाठी आंदोलनदेखील केले आहे. यादरम्यान गोगावले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यासह अदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टिकेला राष्ट्रवादीने उत्तर देत इशारा दिला आहे. जशाच तसे उत्तर दिले जाईल, असेही म्हटले आहे. यामुळे पालकमंत्रीपदावरून तटकरे-गोगावले वाद वाढला आहे.
शेकापक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार जयंत पाटील यांना पालकमंत्रीपदाच्या वादावरून पत्रकारांनी विचारले असता, तटकरे-गोगावले यांच्यावर टिका करीत पालकमंत्र्याला एवढं महत्व असतं हे कधीच समजलं नव्हतं. पालकमंत्री पदावरून सध्या वाद सुरू झाल्यानंतर महत्व समजलं आहे. पालकमंत्री वाद रस्त्यावरून सुटणारा नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दालनात सुटणारा प्रश्न आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.