नवी मुंबईत नियम मोडणार्‍या बिल्डर्सच्या परवानग्या रद्द करणार , महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा इशारा

25 Jan 2025 13:04:14
 new mumbai
 
नवी मुंबई | नवी मुंबईत नियम मोडणार्‍या बिल्डर्सच्या परवानग्या रद्द करणार असून, दंड आकारणी आणि वारंवार समज देऊनही बधत नसलेल्या विकासकांच्या बांधकाम परवानग्या थांबविल्या जातील, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिला आहे. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत.
 
बांधकामांच्या ठिकाणी केले जाणारे स्फोट, ध्वनी तसेच वायुप्रदूषणाच्या नियंत्रणासाठी महापालीकेने वेगवेगळ्या उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. या नियमाकडे दुर्लक्ष करुन वेळी-अवेळी काम करण्यात येते, तसेच रस्त्यांवर बांधकाम साहित्याने भरलेली वाहने उभी केली जातात.
 
त्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. महापालिका कार्यक्षेत्रात खोदकामांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी आणि वायुप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही बिल्डरांकडून नियमांची ऐशीतैशी करत सर्रास स्फोट घडविले जात आहेत. त्यामुळे आसपासच्या इमारतींना हादरे बसू लागले असून घरांच्या भिंतींना तडे जाणे, प्लास्टर निखळणे असे प्रकार आता नित्याने होऊ लागले आहेत.
 
मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधी अलीकडे स्वत:हून दाखल करून घेतलेल्या याचिकेत काही आदेश दिले आहेत. त्यानुसार ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी काही सूचनाही दिल्या आहेत. धूळ तसेच ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना, बांधकामांसाठी आखून दिलेल्या वेळा मोडणे, बांधकाम साहित्याची ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वाहनांवर धुळप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना टाळणे असे प्रकार सातत्याने होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ठरावीक रकमेचा दंड भरायचा आणि आपली मनमानी सुरूच ठेवायची, असे प्रकार घडू लागल्याने या प्रकारांची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली आहे.
...अन्यथा बांधकाम परवानगी रद्द
दंड आणि नोटिसा बजावूनही प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर बांधकाम प्रकल्पांची परवानगी थांबवली जाईल, अशा स्पष्ट सूचना बिल्डर संघटनेला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोमनाथ केकाण यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0