रोहा | महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वाद विकोपाला गेला आहे. पालीनंतर शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर त्यांच्याच होमग्राऊंडवर जाऊन पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांची ‘बेईमान बादशाह’ अशा शब्दांत बोचरी टिका केली आहे.
रोहा शहरात विविध कार्यक्रमांसाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे शुक्रवारी (२४ जानेवारी) रोहा येथे आले होती. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी खा. तटकरे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. लोकसभेला त्यांची (तटकरे) लाज राखण्याचे काम आम्ही केले.
आम्ही जसे प्रामाणिक काम केले; तसे त्यांनीही करावे, असे आम्हाला वाटत होते. परंतू वस्तुस्थिती समोर आली. ते पाहिल्यानंतर हा आमचा उद्रेक होत आहे; अन्यथा आम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने सुसंस्कृत आहोत, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत गोगावले यांनी सुनावले आहे.
मातीत झोपवल्याशिवाय गप्प बसणार नाही-आ.महेंद्र दळवी
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही, तटकरेंना दुकान बंद करण्याचा सल्ला दिला. भरतशेठ मंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील सामान्य माणसाला झाला; मात्र या आनंदात विरजण घालण्याचे काम रोह्यातील काही महाभागांनी केले, पण शिवसैनिक लढवय्या आहे. रस्त्यावर उतरुन लढू, असा इशारा आ.दळवी यांनी दिला आहे.
तसेच बुजूर्गानी थोडे स्वतःला आवरा, आपली गंमत बरीच वर्षे लोकांनी पाहिली आहे. अनेकवेळा अनेकांना फसवलेत, आता लोकंच तुम्हाला फसवणार आहेत. तुमच्या पोरा टोरांनाही आवरा, कुठे काय बोलायचे ते सांगा. तुम्हाला वाटतं तुमचीच मक्तेदारी आहे. पण हा रायगडचा योध्दा तुम्हाला मातीत झोपवल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी टिका आ. महेंद्र दळवी यांनी केली आहे.
बेईमान बादशाह; आ.थोरवेची बोचरी टिका
जगातील एकमेव राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. औरंगजेबाचे नाव कोणी घेतं का हो? त्यांची कर्म चुकीची होती आणि चुकीचे कर्म करणार्यांचे नाव घेतले जात नाही.
तुमच्याकडेही एक बेईमान बादशाह जन्माला आला आहे. ज्यावेळी शिवसैनिकाला डिवचले जाते, त्यावेळी शिवसैनिक हिशोब चुकता केल्याशिवाय राहत नाही, अशी बोचरी टिका आ.महेंद्र थोरवे यांनी नाव न घेता केली.