अलिबाग | जलजीवन योजनेचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी रोहा तालुयातील सुकेळी गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत. रायगड जिल्हा परिषद मुख्यालयासमोर शुक्रवारी (२४ जानेवारी) त्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. योजनेचे काम पूर्ण करण्याबरोबर संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे.
सुकेळी गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आले. २ कोटी रूपये खर्चाच्या या योजनेतून सुकेळी ठोंबरेवाडी, वेताळवाडी, आदिवासी वाडी, गणपतवाडी, धनगरवाडा आदि वाडया वस्त्यांवरील सुमारे २ हजार लोकवस्तीला पाणीपुरवठा केला जाणार आहे. हे काम सुरू झाल्यानंतर काही दिवसातच तेथंबवण्यात आले. काम पूर्ण करण्याची मुदत मागील वर्षीच्या जानेवारीत संपली.
त्याला वर्ष उलटले तरी अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. मागील वर्षी देखील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. जिल्हा परीषदेच्या अधिकारयांसोबत बैठका झाल्या. ग्रामस्थांनी पत्रव्यवहार केला .परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. ग्रामपंचायत देखील यात लक्ष घालत नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी आता आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. या योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे आणि कामाच्या रखडपट्टीस जबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आंदोलक महिलांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. जर तातडीने काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आमच्या गावात मोठी पाणी टंचाई आहे. मार्च एप्रिल महिना आला की ती अधिक तीव्रतेने जाणवते. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. जलजीवन योजनेचे काम मागील वर्षभरापासून रखडले आहे. वारंवार लक्ष वेधूनही याकडे कुणी पहात नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले. - सविता दंत, ग्रामस्थ महिला