जिल्ह्याच्या मुख्यालयाला चांगल्या रस्त्याची प्रतिक्षा , वडखळ-अलिबाग रस्त्याच्या कामाची टोलवाटोलव

25 Jan 2025 16:33:04
alibag
 
अलिबाग | जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोडणारा एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. अलिबाग-वडखळ मार्गाचा दहा वर्षापूर्वी चौपदरीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला; परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामाची जबाबदारी कोणत्या खात्यावर आहे हेच अद्याप प्रशासनाने निश्चित झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता केव्हा पूर्ण होणार? असा सवाल नागरिक व्यक्त करीत आहेत.
 
मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्यासाठी वडखळ- अलिबाग हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. या मार्गावर नेहमी रहदारी असल्याने त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी केली जात आहोत. २३ जानेवारी रोजी माजी आमदार पंडित पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेत महामार्गाच्या कामकाजाचा आढावा घेतला. महामार्गाच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू आहे.
 
महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोन्ही विभाग या रस्त्याची जबाबबदारी झटकत आसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अलिबागकरांना पडला आहे. सुरवातीला अलिबाग ते वडखळ हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्याला राज्य मार्गाचा दर्जा होता. नंतर मात्र याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आले.
 
यानंतर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याचे सर्वेक्षण, प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला होता. पण रस्त्याच्या किमतीपेक्षा भुंसपादनाची किमंत अधिक असल्याने आणि याच परिसरात अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प येणार असल्याने या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव बारगळण्यात आला. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याची विनंती केली.
 
त्यानुसार हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला. मात्र हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोघेही या रस्त्यांच्या कामाकडे लक्ष्य द्यायला तयार नाहीत. राजपत्रात नोटीफिकेशन प्रसिध्द झाले की महामार्गाची हस्तांतरण होते. तसे नोटीफिकेशन प्रसिध्द झाले आहे.
 
त्यामुळे अलिबाग वडखळ जबाबदारी आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचीच आहे असे सांगत महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर आपल्या विभागाची जबाबदारी झटकुन टाकतात, तर त्याचवेळेला महामार्ग आमच्या ताब्यात अद्याप आलेला नाही. हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण होत नाही तोवर आम्ही पुढची कारवाई करू शकत नाही, असे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग पेणचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र गुंड सांगतात. त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी नक्की कोणाकडे? हेच अद्याप प्रशासनाला समजलेले नाही.
शहराच्या वेशीवर मोठमोठे खड्डे
आज रस्त्याची अलिबाग शहराच्या वेशीवर महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे शहरात येणार्‍या पर्यटक, वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावर असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे. पण तरीही हे खड्डे भरले जात नाहीत.
 
साट्टीच्या दिवशी या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अर्धा तासाचे अंतर पार करण्यासाठी तास ते दीड तास वेळ लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उगवलेली झुडपे काढायची कोणी हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.
या महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे देण्यात आलेली आहे. तशा प्रकारचे नोटीफिकेशन झालेले असतानाही तांत्रिकदृष्ट्या हत्सांतरण झालेले नाही. रस्त्याच्या बाजूचा झाडोरा, खड्डे बुजवणे अशी देखभालीची कामे १५ दिवसात पुर्ण केल्यानंतर पुढील एक महिन्यात या रस्त्याची जबाबदारी हस्तांतरीत केली जाणार आहे. - संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी-रायगड
जिल्ह्याचे मुख्यालय चांगल्या रस्त्यांने जोडणे अत्यावश्यक आहे; मात्र, सातत्याने याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महामार्ग प्राधिकरण हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत केल्याचे सांगते. तर राष्ट्रीय महामार्ग विभाग हा रस्ता आमच्याकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे सांगतो. सतत पाठपुरावा करूनही महामार्गाच्या दोन्ही यंत्रणा टोलवाटोलवी करीत आहेत. - पंडित पाटील, माजी आमदार - अलिबाग विधानसभा
Powered By Sangraha 9.0