मुरुड जंजिरा | भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय विहूर येथे रायगड जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेच्या भव्य पटांगणात भारतीय संविधानाची उद्देशिकाचे जाहीर वाचन करून, उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच कु. रेश्मा तपेसर, उपसरपंच मुसरत उलडे, सदस्य गणेश नाक्ती, महेंद्र कदम, परेश तांबे व इतर सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, इकरा शाळेचे शिक्षक व विद्यार्थी तसेच विहूर व मोरा गावासह मुरुड तालुक्यातील अन्य प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी आपल्या बिकट परिस्थितीवर मात करून, जिल्हा परिषद मराठी शाळा विहूर येथे प्राथमिक शिक्षण घेऊन सध्या महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, मंत्रालय येथे सहायक लेखा अधिकारी (वर्ग-२, राजपत्रित) या उच्चपदावर शासकीय सेवेत कार्यरत असलेले व काही काळ उपकोषार अधिकारी मुरुड या पदावर सेवा केलेले, विहूर गावातील प्रतिष्ठित व आदर्श व्यक्तिमत्व मंगेश बाळकृष्ण येलवे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रबळ इच्छाशक्ती असेल तर परिस्थितीचे कारण न सांगता अथक मेहेनत, जिद्द, प्रयत्न व शिक्षण यामुळे ग्रामीण विद्यार्थी आपल्या सर्व अडचणींवर मात करून यशस्वी होऊ शकतो, असे येलवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्याकडून शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर श्री. येलवे यांच्या हस्ते विहूर मधील प्रसिद्ध एस.ए. गोल्डन रिसॉर्ट येथे ध्वजारोहण झाले.यावेळी असंख्य शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.