नागोठणे ग्रामपंचायतीत स्मार्ट मीटरला नो एंट्री ! ग्रामस्थांच्या हितासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर

28 Jan 2025 16:10:16
 alibag
 
नागोठणे | महाराष्ट्र वीज वितरण कंपनी निविदा प्रक्रिया राबवून राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील घराघरात स्मार्ट मीटर बसविण्याची लगीनघाई संबंधित ठेकेदारांकडून सध्या सर्वत्र सुरु आहे. तर दुसरीकडे शहरी भागांसह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेता या स्मार्ट मीटरला तीव्र विरोध होत असताना, नागोठणेत स्मार्ट मीटरला नो एंट्री करण्यात आली आहे.
 
स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य जनतेला आपले जीवन जगणे फार कठीण होईल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मिटर विरोधात मोहीम चालू असून नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत स्मार्ट मीटर कोणाच्याही घरात लागता कामा नये व जेथे जेथे लागले असतील ते काढून टाकण्यात यावेत, अशा सूचना नागोठणे ग्रामपंचायतीने नागोठणे वीज वितरण कंपनीला द्याव्यात, असा ठराव सामाजिक कार्यकर्ते सगीर अधिकारी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत मांडला.
 
त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून अनुमोदन ग्रामपंचायत हद्दीत लावण्यात येणार्‍या स्मार्ट मीटरला जोरदार विरोध केला. त्यामुळे शिवसेना नेते किशोर जैन यांच्या मार्गदर्शनाखालील ग्रामसभेच्या अध्यक्ष सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, पहिले लोकनियुक्त सरपंच तथा सदस्य डॉ. मिलिंद धात्रक यांच्या उपस्थितीत नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत स्मार्ट मीटरला नो एंट्रीचा ठराव सर्वानुमते मंजूर करत हा ठराव रेकॉर्डवर घेण्यात आला आहे. यावेळी किशोर जैन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महामार्गाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
 
महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्याची पूर्णतः जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, त्यांना नेमून दिलेले ठेकेदार यांच्यासह पोलिसांची आहे. त्यामुळे या सर्वांची आपापले कर्तव्ये पार पाडत अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. याचबरोबर गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याची जबाबदारी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांची असून कुठल्याही पक्षाने निधी आणला तरी त्याला एनओसी देण्याची जबाबदारी आमची असेल, असे सांगून सध्या नागोठण्यात १२५ वर्षाचे जुने जैन मंदिर जीर्णोद्धार सोहळा चालू आहे. सर्वांच्या उन्नती व उत्कर्षासाठी फार मोठ्या प्रमाणात पूजापाठ चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ग्रामसभेला ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे, सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, ज्ञानेश्वर साळुंखे, संतोष नागोठणेकर, अ‍ॅड.प्रकाश कांबळे, सचिन ठोंबरे, सदस्या शबाना मुल्ला, सुप्रिया काकडे, अमृता अनिल महाडिक, पूनम काळे, विनिता पाटील, भाविका गिजे, ज्योती राऊत, शहानाज अधिकारी, जन्नत कुरेशी, सुलतान लंबाते, मंगी कातकरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0