१ फेब्रुवारीपासून करणार आमरण उपोषण , शिवशाही व्यापारी संघटनेचा इशारा; कारवाईची मागणी

28 Jan 2025 18:58:24
khopoli
 
खोपोली | खालापूर तालुयात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून ओव्हरलोड वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते आहे. यासंदर्भात तक्रारी करुनही आरटीओ विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने १ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवशाही व्यापारी संघटनेने दिला आहे.
 
शिवशाही व्यापारी संघटनेच्या वाहतूक विभागाचे कोकण प्रदेशाध्यक्ष संगम जाधव यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, आरटीओ विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने २४ जानेवारीपासून सावरोली टोलनायाजवळ २४ तास जागता पहारा देत अनोखे आंदोलन करण्यात आले.
 
आरटीओ विभाग आणि ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या वाहनमालकांचे लागेबांधे असल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप संगम जाधव यांनी केला आहे. आरटीओ विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करतानाच, पेण व पनवेल आरटीओ विभागाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री व वरिष्ठ विभागाकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
आरटीओ विभागाशी पत्रव्यवहार करुन तसेच फोनद्वारे वेळोवेळी माहिती देऊनही आरटीओ विभाग ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करत नाही. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून शिवशाही व्यापारी संघटना वाहतूक विभाग आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
 
२४ जानेवारीपासून सावरोली टोलनायाजवळ सुरू करण्यात आलेल्या २४ तास जगता पहारा आंदोलनात शिवशाही व्यापारी संघटनेच्या वाहतूक विभागाचे कोकण प्रदेशाध्यक्ष संगम जाधव, रायगड जिल्हा अध्यक्ष योगेश बैलमारे, उपाध्यक्ष शेखर धोत्रे, खालापुर तालुका अध्यक्ष अनिल म्हामुनकर, उप तालुकाध्यक्ष अर्जुन देशमुख हे सहभागी झाले असून या आंदोलनाला अनेक स्तरावरून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आरटीओ विभाग सर्वसामान्य वाहनचालकांवर कारवाई करत मोठे दंड आकारत असताना ओव्हरलोड वाहतूक बिनधास्तपणे करणार्‍या वाहनांवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0