स्टील चेंबरचे संचालक मंडळ बरखास्त!

29 Jan 2025 18:07:52
 panvel
 
पनवेल | कळंबोली लोहपोलाद बाजार समितीच्या आवारातील स्टील चेंबर बिझनेस अँड ऑफिस प्रिमायसेस सहकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. पाच वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. त्याचबरोबर स्वीकृत सदस्यसुद्धा निवडता येणार नाही. सिडको सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकांनी हा निर्णय दिला आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या लोहपोलाद बाजाराच्या बाजूला ऑफिस प्रिमायसेस इमारती आहेत. त्यामध्ये स्टील चेंबर ही सर्वाधिक मोठी सोसायटी आहे.
 
या ठिकाणी दीड वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या सोसायटीने वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही. यासंदर्भात सभासदांनी वारंवार अर्जसुद्धा केले होते. मात्र नरेश शर्मा चेअरमन असलेल्या संचालक मंडळाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. इतक्या मोठ्या ऑफिस प्रिमायसेस सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा न झाल्यामुळे माजी चेअरमन बबन दांगट यांनी थेट सिडको सहकारी संस्था नवी मुंबई यांच्या सहाय्यक निबंधकांकडे तक्रार नोंदवली.
 
यासंदर्भात सोसायटीच्या जबाबदार व्यवस्थापन समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली.५ ते १७ डिसेंबर २०२४ यादरम्यान सुनामी सुद्धा घेण्यात आली यावेळी तकादारांकडून प्रभाकर उंडे, दत्तात्रय आंधळे हे सभासद आणि त्यांचे वकील अ‍ॅड. शिंदे आणि राजकुमार जगताप उपस्थित होते. प्रतिवादीच्यावतीने निलंबित करण्यात आलेले चेअरमन नरेश शर्मा व तत्कालीन खजिनदार प्रवीण कोरडे उपस्थित होते.
 
त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. पावसाचे पाणी घुसल्याने याबाबतच्या सर्व फायली भिजल्याचं कारण त्यांनी पुढे केले. मात्र ही गोष्ट संयुक्तिक ठरत नसल्याचे सांगत सहाय्यक निबंधकांनी चेअरमन, सचिव, खजिनदार आणि सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. पुढील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये समिती सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र ठरणार नाही अशा प्रकारचे आदेश सहकारी संस्था सिडको नवी मुंबई या कार्यालयाचे सहाय्यक निबंधक शंकर पाटील यांनी निर्गमित केले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0