पनवेल हिरानंदानीमधील घर रिकामे करण्यासाठी मराठी कुटूंबावर दबाव

29 Jan 2025 16:27:20
 panvel
 
पनवेल | खोलीचे करार संपल्यानंतरही घरात राहणार्‍या एका मराठी कुटुंबाला त्या सोसायटीच्या चेअरमनकडून शिविगाळ केल्याचा दावा या मराठी कुटुंबियांकडून केला गेला आहे. मराठी माणसांची इथे राहण्याची लायकी नाही असं म्हणत शिविगाळ केली गेल्याचं या कुटुंबाचं म्हणणं आहे.
 
पनवेलमधील भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत गायकवाड कुंटूंब भाड्याने खोली घेऊन राहतात.त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर ते दुसर्‍या रुमची शोधाशोध करत असल्याने त्यांनी त्या संदर्भात घर मालकाला कळवलं होतं, त्यांचं मुल लहान असल्याने घरमालकाने त्यांना राहण्याची परवानगी दिली होती, तरीही या सोसयाटीच्या महिला चेअरमनकडून रुम सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
या वादात गायकवाड यांना हृदयाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागले. या घटनेची माहिती मिळताच मनसेने जाब विचारला, मनेसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष अदिती सोनार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मराठी माणसांवर होत असलेल्या अरेरावीचा जाब विचारला.
 
परिणामी चेअरमन वसुंधरा शर्मा महिलेने सर्वांचीच माफी मागितली आहे व यापुढे एकाही मराठी कुटुंब किंवा भाडेकरू कुटुंबांना त्रास देणार नाही याची कबुली दिली आहे. दरम्यान, या महिला चेअरमनने आतापर्यंत तीन ते चार मराठी कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे, अशी माहिती मनसे पदाधिकार्‍यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0