पेण | भारतीय सैन्य दलात सतरा वर्षे प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होऊन गावी परतलेले हवालदार मंगेश पाटील यांचे वरसई फाटा ते आष्टे येथे मिरवणूक काढून ढोल ताशाच्या गजरात, भारत माता की, जय जवान जय किसान, अशा घोषणा देत व तिरंगा हातात घेऊन, फुलांची उधळण करून, स्वागत करण्यात आले.
यावेळी गागोदे, वरसई, वशिवली, आष्टे येथील गावकर्यांनी ठिकठिकाणी मिरवणूक थांबवून त्यांचे औंक्षण व सत्कार करण्यात आला. आगळ्यावेगळ्या जोशामध्ये, स्वागत करत समस्त वरसई विभाग व ग्रामस्थांच्या व मित्र परिवाराच्यावतीने मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला. पेण तालुयातील आष्टे गावातील असून त्याने वरसई येथील कै पू गोडसे विद्यालयामध्ये त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले.
पुढील शिक्षण पेणमध्ये केले, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मंगेश जगन्नाथ पाटील ग्रामीण भागातील तरुण लहानपणापासून सैन्य दलात जायची इच्छा असल्यामुळे तसा लहान वयापासूनच प्रयत्नशील होता व त्यातूनच तो भारतीय सैन्य दलात १७ वर्षांपूर्वी भरती झाले. भारताच्या विविध कानाकोपर्यात सैन्य दलात सेवा केल्यानंतर १७ वर्षांनी हवालदार मंगेश पाटील सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्ती घेऊन ते १ जानेवारी २०२५ दिवशी आपल्या मूळ गावी आष्टे येथे परतले.
येथे मंगेश यांचे भव्यदिव्य असे स्वागत करण्यात आले. भारत माता की जय, जय जवान जय किसान, घोषणा व फटायांची आतीषबाजी, फुलांची उधळण यामुळे वातावरण देशमय झाले होते. ढोल ताशाच्या गजरात कारमधून मिरवणूक काढण्यात आली. तसेच वरसई विभागातील ग्रामस्थ, विविध संस्था, संघटना यांच्यावतीने शाल, पुष्पगुच्छ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त व सत्कारमूर्ती हवालदार मंगेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गावातील सर्वांनी एकत्र येऊन माझे जे अभूतपूर्व स्वागत केले, जो सन्मान केला, त्यामुळे मी खूपच भारावून गेलो आहे. देशसेवा करताना माझे घर, माझी शाळा, माझे गाव, माझे मित्र यांची मला नेहमी आठवण येत होती. देशसेवेमध्ये जो आनंद, स्वाभिमान, अभिमान, शिस्त, स्वावलंबन व प्रामाणिकपणा शिकायला मिळाला, तो खूप मोठा आहे.
सेवानिवृत्त झाल्यानंतर मनाला वाईट वाटते. मात्र यापुढेही इतर प्रकारे का होईना देशसेवा, समाजसेवा करत राहणार व गावातील इतर तरुण मुलांना देश सेवेसाठी जाण्यासाठी प्रेरणा देत राहील. असे ते म्हणाले. माझे स्वागत, माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे यावेळी त्यांचे आभार मानले. यावेळी माजी सैनिक, वरसई विभागातील कार्यकर्ते, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.