पनवेल | थर्टी फर्स्टची रात्र, जितेंद्र जग्गी याने दोन तरुणांना पार्टी करण्यासाठी बोलवले... तिथे तिघेही दारु प्यायले आणि थर्टी फर्स्ट साजरा केला. त्यानंतर जितेंद्र जग्गी हा या दोघांना समलैंगिक संबंध ठेवण्याकरिता आग्रह करत होता. त्यामुळे संतापलेल्या शुभम नारायणी आणि त्याचा मित्र संज्योत दोडके यांनी जग्गी आणि त्याच्या वयोवृध्द आईची हत्या केली.नववर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने कामोठे हादरुन गेले.
मात्र अवघ्या २४ तासांत पोलिसांनी त्या दोघांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.बुधवारी कामोठे सेक्टर ६ येथील ड्रीम्स सोसायटीत रुम नंबर १०४ मध्ये गॅस लिक होऊन वास येत असल्याची माहिती कामोठे पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार बीट मार्शल त्या ठिकाणी पोहोचले. मात्र घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे समजतात अग्निशमन दलाच्या सहकार्याने हा दरवाजा उघडण्यात आला. आतमध्ये जितेंद्र भूषण जग्गी (वय ४५) व त्यांची आई गीता भूषण जग्गी (वय ७०) हे मृत अवस्थेत आढळून आले.
कामोठे पोलिसांची चक्रे सुरु झाली. घटनास्थळी लागलीच परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, गुन्हे विभागाचे एसीपी अजयकुमार लांडगे घटनास्थळी दाखल झाले. विविध तपास पथके तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत आणि कळंबोली चे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले यांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्याचबरोबर साक्षीदारांकडे विचारपूस केली असता संज्योत मंगेश दोडके (वय १९) याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली.
गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुकाराम सूर्यवंशी यांनी संज्योत आणि शुभम महिंद्र नारायणी यांना उलवे येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता, मयत जितेंद्र जग्गी हा त्यांच्या चांगल्या परिचयाचा असल्याची माहिती पुढे आली. ३१ डिसेंबर २०२४ रोजी जग्गी याने या दोघांना पार्टी करण्यासाठी बोलावले होते. तिथे तिघेही दारु प्यायले आणि थर्टी फर्स्ट साजरा केला.
त्यानंतर जितेंद्र जग्गी हा या दोघांना समलैंगिक संबंध ठेवण्याकरिता आग्रह करत होता. त्यामुळे संतापलेल्या शुभम नारायणी याने एक्सटेंशन बोर्ड डोक्यात घालून त्याची हत्या केली. संज्योत दोडके याने जितेंद्र जग्गी यांच्या आईचा गळा आवळून खून केला. जाताना मोबाईल फोन, पाकीट, टॅब व काही दागिने घेऊन गेल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे करीत आहेत.
या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, अजय कुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, हनीफ मुलानी, विमल बिडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कानगुडे, संतोष चव्हाण, एकनाथ देसाई, सुरज गोरे, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, अभयसिंह शिंदे, माधव इंगळे, लिंगराम देवकाते, आकाश पाटील, किरण राऊत, अमोल चौगुले, पोलीस अंमलदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सूर्यवंशी, निलेश पाटील, दीपक डोंगरे, इंद्रजीत कानू, रुपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, अजिनाथ फुंदे, विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.