मुरुड | ‘रायगड टाइम्स’ आयोजित ‘मुरुड बीच शो’ने मुरुडकरांसह पर्यटकांचीही मने जिंकली आहेत. ‘रायगड टाइम्स’चे संपादक राजन वेलकर, पत्रकार भारत रांजणकर यांच्या प्रयत्नामुळे ‘मुरुड बीच शो’च्या माध्यमातून येथील कलाकारांना व्यासपीठ मिळाले आहे. याबद्दल कलासागर नाट्यसंस्था, कोमसाप मुरुड तसेच मुरुडच्या नागरिकांतर्फे ऋण व्यक्त करतो, असे गौरवोद्गार मुरुड कोमसापचे अध्यक्ष, माजी नगरसेवक संजय गुंजाळ यांनी काढले.
आमदार महेंद्र दळवी यांच्या सहकार्याने नववर्षाच्या पूर्वसंध्येला (३१ डिसेंबर २०२४) ‘मुरुड बीच शो’च्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन संजय गुंजाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. श्री व सौ. विजय लखमदे, प्राध्यापक डॉ.नारायण बागुल, अॅड.राकेश चोगले, अस्मिता गुरव, शिल्पा मसाळ, प्रचित मसाळ, विकास भाटकर, राजश्री सुरेश सदे्र आदी मान्यवर उपस्थित होते.
‘मुरुड बीच शो’चे व्यवस्थापन पाहणारे अमोल रणदिवे यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. सुरुवातीपासूनच हा कार्यक्रम करण्यासाठी ते मेहनत घेत असल्याचे सांगत, त्यांनी रणदिवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कलासागर नाट्यसंस्था व कोमसाप मुरुड हे ‘बीच शो’च्या पूर्णपणे पाठीशी राहतील, अशी ग्वाही गुंजाळ यांनी दिली.
यावेळी मुरुडचे गायक कलाकार राहुल वर्तक, मंदार मुंबईकर, पुजा सदरे, अमोल रणदिवे, केतक वर्तक यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मुरुडकरांसह पर्यटकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत, गायन व इतर कला सादर केल्या. संगीत संयोजन नयन भायदे यांनी अत्यंत उत्कृष्ट रितीने केले.
लाठी असोशिएशन रायगड-अलिबाग तर्फे लाठी काठीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्नेहा प्रचित मसाळ, प्रियेश प्रचित मसाळ, स्नेहा प्रचित मसाळ, आरोही आशिष दांडेकर, शिवतेज रमेश भगत, मृदानी योगेश मसाल, आखिर शिल्पा प्रचित मसाळ, आदींनी लाठी काठीमध्ये सहभाग घेतला. या बीच शोला मोठ्या संख्येने नागरिक, पर्यटक उपस्थित होते. त्यांनी धम्माल करत, सरत्या वर्षाला निरोप देत, नववर्षाचे जोरदार स्वागत केले.