पेण | राज्य सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्याची योजना जाहीर केली तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचेही काम सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण रामवाडी येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाने एसटी तिकीट दरवाढीविरोधात चक्का जाम आंदोलन केले. यावेळी पेण, अलिबागमधील शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले.
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून बुधवारी, २९ जानेवारी रोजी कार्यकर्त्यांनी पेण शहरातील विभागीय मध्यवर्ती बसस्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी काहीकाळ बसदेखील शिवसैनिकांनी रोखून धरल्या होत्या. तात्काळ भाडेवाढ निर्णय रद्द करावा, अशी मागणी यावेळी केली. जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी भाडेवाढ रद्द करा अन्यथा जनतेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन करू, असा इशारा पेण विभागीय परिवहन अधिकारी यांना दिला.
फसवी आश्वासने देवून निवडणुका लढवली. आता भाडेवाढ करून सामान्य जनतेला हा भुर्दंड देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आम्ही शिवसैनिक कधीच हे होऊ देणार नाही असेदेखील ते म्हणाले. यावेळी युवा जिल्हा अधिकारी अमिर ठाकुर, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, समीर म्हात्रे, तालुका प्रमुख जगदीश ठाकुर, मुरुड तालुका प्रमुख नवशाद दळवी, महिला जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, मारुती भगत व अन्य पदाधिकारी तसेच शिवसैनिक सहभागी झाले होते.