माथेरानमधील ई-रिक्षांमध्ये वाढ करावी , महिलांची रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

30 Jan 2025 17:30:48
 KARJT
 
नेरळ | माथेरान या पर्यटनस्थळी पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालविल्या जात आहेत. या ई-रिक्षा माथेरानमधील अमानवी प्रथा बंद करण्यासाठी हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा चालविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र अजूनही ७४ हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा चालविण्याची परवानगी दिलेली नाही आणि त्या सर्व हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा चालविण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करण्यासाठी माथेरानमधील महिला अलिबाग येथे पोहचल्या होत्या.
 
दरम्यान, रायगड जिल्हाधिकार्‍यांना याबाबत निवेदन देत ही मागणी केली आहे.माथेरानमध्ये ९४ हातरिक्षा चालक असून त्या हात रिक्षाचालकांचे श्रम कमी करावेत, यासाठी सर्वोच्य न्यायालयाने पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानंतर ९४ पैकी केवळ २० हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा चालविण्याची परवानगी दिली आहे.
 
उर्वरित सर्व ७४ हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा चालवण्याची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी माथेरानमधील महिला रायगड जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी अलिबाग येथे पोहचल्या होत्या. साधारण २०० महिलांच्या सह्यांचे निवेदन घेवून या महिला अलिबाग येथे पोहचल्या होत्या.
 
सरस्वती माध्यमिक विद्यालय प्राचार्य गव्हाणकर विद्यालयाच्या निवृत्त मुख्याध्यापिका कल्पना पाटील, तसेच वर्षा शिंदे, अर्चना बिरामने, रिझवाना शेख, सुजाता जाधव आणि सुहासिनी दाभेकर यांनी सह्यांचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी हे बाहेर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांना सादर केले.
 
या निवेदनात माथेरानमधील सर्व हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा त्वरित सुरू करणे, प्रवासी आणि पर्यटक तसेच शहरातील नागरिक आणि विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये यासाठी माथेरान शहरात २४ तास ई- रिक्षाची सेवा सुरू ठेवावी. माथेरान शहरातील अर्धवट असलेल्या ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते कामकाज त्वरित सुरु करावे. माथेरान सनियंत्रण समितीमध्ये माथेरान मधील एक प्रतिनिधी असावा. वरील सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पुढील आठवड्यात सनियंत्रण समितीची सभा होणार आहे,त्यात हे विषय समाविष्ट करण्यात येतील असे ओशासन दिले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0