पर्यटन स्थळांवर होणार आता पर्यटन पोलिसांची नियुक्ती

By Raigad Times    30-Jan-2025
Total Views |
 delhi
 
मुंबई | राज्यात येणार्‍या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे, असे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
 
पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, सेवानिवृत्त पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल व इतर संस्थेमार्फत पर्यटन पोलीसांची नेमणूक करण्यात येणार आहे. महाबळेश्वर येथे होणार्‍या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवात प्रायोगिक तत्वावर ५० पर्यटन पोलीस यांना विशेष प्रशिक्षण देऊन नियुक्त करण्यात येणार आहे.
 
यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचार्‍यांची माहिती लवकर सादर करावी. पर्यटन पोलीस या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनच्या सवंर्धनासाठी प्रयत्न करतील, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.