नेरळमधील प्रशासकीय राजवट जनतेच्या मुळावर , स्मशानभूमीजवळ मृत कोंबड्यांचे ढीग

31 Jan 2025 13:11:28
KARJT
 
कर्जत | नेरळ ग्रामपंचायत कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमी आहे. त्या स्शानभूमीच्या बाजूला असलेल्या पुलावरून मेलेल्या कोंबड्या टाकल्या जात आहेत. त्याची दुर्गंधी स्मशानभूमीच्या बाजूने ये-जा करणार्‍यांना सहन करावी लागत आहे. कोंबड्यांना बर्ड फ्लूने पछाडले असून जिल्ह्यातील उरण तालुयात चिकन विक्री बंद ठेवण्यात आली होती.
 
त्या धर्तीवर नेरळमधील चिकन व्यवसायिकांकडून मेलेल्या कोंबड्या आणि त्यांचे सडलेले साहित्य नेरळ गावातील स्मशानभूमीची बाजूला असलेल्या पुलाखाली टाकले जात आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीमध्ये असलेली प्रशासकीय राजवट जनतेच्या मुळावर उठली असून, मृत कोंबड्या फेकणार्‍यांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. कल्याण नेरळ कर्जत रस्त्याच्या एका बाजूला स्मशानभूमी तर दुसर्‍या बाजूला नेरळ ग्रामपंचायत कार्यालय आहे.
 
ग्रामपंचायत कार्यालयापासून जेमतेम १०० मीटर अंतरावर असलेल्या समशानभूमीच्या बाजूला असलेल्या नाल्यात सडलेल्या कोंबड्या टाकण्यात येत आहेत. स्मशानभूमी रस्त्याने ये जा करणार्‍या रहिवाशांना तेथून जाताना दुर्गंधी यांना त्रास सहन करीत जावे लागते. त्यात स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या रहिवासी आणि पाहुण्यांनादेखील असाच त्रास सहन करावा लागत आहे. सध्या रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाची लागण बॉयलर कोंबड्यांना झाली आहे.
 
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा बॉयलर कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला असेल तर त्यांना जमिनीत खड्डा खोदून गाडून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. तरीदेखील नेरळ ग्रामपंचायतीकडून स्मशानभूमी परिसरात दिवसाढवळ्या सडलेल्या आणि मेलेल्या कोंबड्या टाकल्या जात असताना कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.
 
नेरळ ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत; मात्र ते सर्व कॅमेरे हे केवळ दिखाऊपणाचे लक्षण आहे. त्या कॅमेर्‍यांची स्थिती मृत अवस्थेतील असून त्यांच्याकडे अनेक वर्षे कोणी पाहिलेले नाही. दुसरीकड़े त्या रस्त्याने जाणार्‍या प्रत्येकाला बॉयलर चिकनच्या दुर्गंधीचा त्रास दररोज होत आहे. तरीदेखील ग्रामपंचायतीमधील प्रशासकीय राजवटमधील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्मशानभूमीजवळ कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये म्हणून आम्ही मोहाची वाडी ग्रामस्थांची सतत मागणी राहिली आहे. आमच्या भागातील ग्रामस्थांना त्या पुलावरून जाताना नाकावर रुमाल लावून जावे लागते. ग्रामपंचायतीचे तेथे कॅमेरे आहेत; मात्र ते बंद असून त्यांच्या दुरुस्तीकडे पहायला प्रशासकांना वेळ नाही.
 
सध्याची प्रशासकीय राजवट नेरळ ग्रामस्थांना त्रासाची ठरत असून आम्ही पूर्वी ग्रामपंचायत सदस्यांना फोन केला तरी कचरा उचलायला माणसे यायची. आता प्रशासकांना गावात कुठे दुर्गंधी पसरली आहे याचे काही देणे-घेणे दिसत नाही. त्यामुळे लवकरात लवकर नेरळ गावाला शहराचा दर्जा शासनाने द्यावा आणि नगरपरिषद करावी. जेणेकरून आम्हाला शासनाचा अधिकारी मिळेल आणि गावातील अनधिकृत कामांवर नियंत्रण येईल. -गोरख शेप, ग्रामस्थ आणि मानवाधिकार कार्यकर्ते
आम्ही तात्काळ तेथे जाऊन पाहतो आणि जी कोणी व्यक्ती कचरा तसेच सडलेले मांस टाकताना आढळल्यास कारवाई करतो. आम्ही लक्ष ठेवून कारवाई करू शकतो आणि बॉयलर कोंबड्यांबाबत पत्रक काढून अशा मेलेल्या कोंबड्या जमिनीत गाडून टाकण्याचे निर्देश दिले जातील. -सुजित धनगर, प्रशासक, नेरळ ग्रामपंचायत
Powered By Sangraha 9.0