रेड्यांच्या झोंबीचा महावितरणला धसका , इशारा देताच लागली कामाला

04 Jan 2025 13:24:25
 poladpur
 
पोलादपूर | ‘आमची माती आमची माणसं’ संघटनेकडून गेल्या आठवड्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील महावितरणशी संबंधित विद्युत ग्राहक आणि जनतेच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास पोलादपूर महावितरण कार्यालयाबाहेर रेड्यांच्या झोंबी लावण्याचा इशारा दिला होता. त्याचा धसका घेत, महावितरण लागलीच कामाला लागली आणि वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यास सुरूवात केली आहे.
 
पोलादपूर महावितरण कार्यालयामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेने पोलादपूर महावितरणला दिलेली एक महिन्याची मुदत देऊन रेड्यांच्या झोंबीच्या आयोजनाचा इशारा दिला होता. त्यानुसार तालुक्यातील एकूण दरवाजा नसलेल्या ७५ ट्रान्सफॉर्मर केबिनचे दरवाजे लावण्यास सुरूवात झाली आहे. एकूण २०५ खराब होऊन सडलेले वीज खांब, १ हजार ८२ खराब विद्युतमीटर बदण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
 
हजारो ग्राहकांचे वाढीव वीजबिल ताबडतोब कमी करण्याकामी सहकार्य केले जात आहे. महावितरण कंत्राटदाराकडून नवीन खांब व नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी अवाजवी रक्कम घेण्यास प्रतिबंध बसला आहे. ग्राहकांची लूट करणार्‍या महावितरण कर्मचार्‍यांवर कारवाई सुरू झाली आहे.
 
पोलादपूर तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातील महावितरणच्या एकूण ७ टीम पोलादपूरमध्ये दाखल होऊन युध्दपातळीवर काम सुरु असल्याची माहिती महावितरणचे अभियंते चोरमाळे, पाटील, महाडीक, चव्हाण आणि कदम यांनी दिली आहे. पितळवाडी व पोलादपूर कार्यालयात येऊन वाढीव वीज बिल कमी करून घेण्यासाठी, जीर्ण खांब, खराब मीटर बदलून घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आमची माती आमची माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे आणि अध्यक्ष निलेश कोळसकर यांनी महावितरणच्या अभियंता अधिकार्‍यांना धन्यवाद दिले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0