अलिबाग | वाहतूक नियम तोडणार्या बेशिस्त वाहनचालकांना दणका देत, रायगड पोलिसांनी सात दिवसांत ५ हजार १२८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर थर्टी फर्स्टच्या रात्री दारु पिऊन वाहन चालवणार्या ८२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
३१ डिसेंबर रोजी मद्यपान करून गाडी चालवणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला होता. मात्र या इशार्याकडे दुर्लक्ष करून मद्यपी वाहन चालविण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
यासाठी पोलिसांकडून १८ ठिकाणी ब्रेथ अॅनालायझर मशीन तैनात ठेवण्यात आली होती. यात ८२ जण मद्यपान करून गाडी चालवत असल्याचे आढळून आले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यात महाड विभागात सर्वाधिक २४, पेण विभागात १५, अलिबाग विभागात १०, खालापूर विभागात ११, रोहा विभागात ९, माणगाव विभागात ६, कर्जत विभागात ३ तर श्रीवर्धन विभागात ३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या शिवाय नाताळ सणापासून मागील सात दिवसात वाहतुक पोलीसांनी व्यापक कारवाई करत ५ हजार १२८ जणांविरोधात वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मोटरसायकल वरून तिघे प्रवास करणार्यां १६२ जणांवर, विना हेल्मेट वाहन चालवणार्या १९६ जणांवर , तर विना सिट बेल्ट वाहन चालवणार्या ८२३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.