नवी मुंबई | नवी मुंबईतील सानपाडा स्टेशननजीक दुचाकीवरून आलेल्या युवकांनी एका व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार केला. एकूण पाच गोळ्या झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून, जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील डी मार्टनजीक शुक्रवारी (३ जानेवारी) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीवरून दोन व्यक्ती आल्या. त्यांनी गाडी थांबवत पाच गोळ्या झाडल्या. यात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. ही घटना ज्या याठिकाणी घडली तो परिसर कायम गर्दी असणारा आहे.
अशा गर्दीतून गोळ्या झाडणारे आपली दुचाकी सुसाट वेगाने काढून पसार झाले. ही माहिती मिळताच सानपाडा पोलीससह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त पंकज दहाणे यांनी घटनेला दुजोरा आहे. गोळ्या झाडणारे नेमके कुठल्या दिशेने आणि कुठे पळाले? याचा तांत्रिक शोध घेणे सुरु आहे. तसेच चारही दिशेला पथके रवाना झालेली आहेत. जखमी व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.